India China FaceOff: मोठी बातमी! गलवान खोऱ्यातून चिनी सैन्य २ किलोमीटर माघारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 11:45 AM2020-07-06T11:45:06+5:302020-07-06T12:17:32+5:30
भारताच्या जोरदार प्रत्युत्तरानंतर चीन बॅकफूटवर; गलवानमधून माघार
नवी दिल्ली: पूर्व लडाखमध्ये सीमेवर निर्माण झालेला तणाव निवळण्याची शक्यता आहे. भारताकडून जशास तसं उत्तर मिळाल्यानं चीननं माघार घेतली आहे. १५ जूनला गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यात रक्तरंजित झटापट झाली. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला. मात्र याच भागातून आता चिनी सैन्य २ किलोमीटरपर्यंत माघारी गेल्याचं वृत्त 'द हिंदू'नं दिलं आहे. त्यामुळे भारत आणि चीनमधील तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
१५ जूनला झालेल्या झटापटीनंतर चिनी सैन्य आणखी पुढे सरकलं. चिनी सैन्य तैनात असलेलं भाग भारताच्या दृष्टीनं प्रत्यक्ष नियंत्रण रेषा समजला जातो. त्यानंतर भारतानंदेखील या भागातील फौजफाटा वाढवला. या भागात बंकरदेखील तयार केले गेले. त्यामुळे दोन्ही सैन्यांमध्ये पुन्हा एकदा झटापट होईल अशी परिस्थिती निर्माण झाली.
Chinese Army has moved back tents, vehicles & troops by 1-2 km from locations where disengagement was agreed upon at Corps Commander level talks: Indian Army Sources pic.twitter.com/hamcQRaCMo
— ANI (@ANI) July 6, 2020
यानंतर ३० जूनला दोन्ही देशांमध्ये कमांडर दर्जाची बैठक झाली. त्यानंतर चिनी सैन्य मागे हटलं की नाही, याची पडताळणी करण्यासाठी रविवारी एक सर्वेक्षण करण्यात आलं. 'गलवान खोऱ्यातील झटापट झालेल्या भागापासून चिनी सैन्य दोन किलोमीटर मागे घेतलं आहे. या भागात उभारण्यात आलेली तात्पुरत्या स्वरुपाची बांधकामं हटवण्याचं काम दोन्ही देशांच्या सैनिकांकडून सुरू आहे,' अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली.
Chinese heavy armoured vehicles still present in depth areas in Galwan river area. Indian army monitoring the situation with caution: Indian Army Sources https://t.co/GbGnoAy4K4
— ANI (@ANI) July 6, 2020
भारत आणि चीनच्या सैन्यात गेल्या दोन महिन्यांपासून तणाव निर्माण झाला आहे. लडाखमध्ये दोन्ही बाजूचे सैनिक मोठ्या संख्येनं तैनात आहेत. ६ जूनला दोन्ही देशांमध्ये सैन्य माघारी घेण्याबद्दल एकमत झालं. मात्र चीननं या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. उलट माघारी हटण्याचं आवाहन करणाऱ्या भारतीय जवानांवर हल्ला केला. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीनचंही मोठं नुकसान झालं. त्यानंतर दोन्ही देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये चर्चा झाली. २२ जूनला दोन्ही देशांच्या सैन्यात कमांडर दर्जाची बैठकही झाली. ही बैठक १० तासांहून अधिक वेळ चालली.
चीनला धक्का देण्याची तयारी; पंतप्रधान मोदी 'खास' माणसावर सोपवणार जबाबदारी?