India China FaceOff: भारताच्या शहीद जवानांसोबत चीनची क्रुरता; पोस्टमोर्टम रिपोर्टमधून मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 04:16 PM2020-06-19T16:16:06+5:302020-06-19T16:17:19+5:30
शहीद जवानांच्या शरीराच्या अवयवांवर खोल जखमांचे निशाण आहेत आणि त्यांच्यासोबत क्रूरपणे मारहाण केली आहे.
नवी दिल्ली – गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांशी लढताना भारताचे २० जवान शहीद झाले. या शहीद जवानांच्या हौतात्म्यावर संपूर्ण देश चीनविरोधात संतापला आहे. आता पोस्टमॉर्टम अहवालात भारतीय सैनिकांच्या अंगावर खोल जखमा झाल्याचं समोर आलं आहे. त्यापैकी काही जण हायपोथर्मिया (अत्यंत कमी शरीराचे तापमान) आणि गुदमरल्यामुळे मरण पावले आहेत. लेहमधील एसएनएम रुग्णालयात मृतदेहांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, शहीद जवानांच्या शरीराच्या अवयवांवर खोल जखमांचे निशाण आहेत आणि त्यांच्यासोबत क्रूरपणे मारहाण केली आहे. चीनी सैन्याने भारतीय सैनिकांवर तारा असलेल्या रॉडने हल्ला केल्याचं स्पष्ट झालं आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, जवळपास १७ जवानांच्या शरीरावर मारहाणीचे खोल निशाण आहेत. लष्कराने जवानांना शहीदांच्या मृतदेहाचे फोटो न घेण्याचे आदेश दिले. सुरुवातीच्या रिपोर्टमध्ये कर्नल संतोष बाबूसह ३ जवानांच्या शरीरावर कोणतेही निशाण आढळले नाहीत, पण त्यांच्या डोक्यावर जोरदार हत्याराने प्रहार केल्याचं दिसून आलं आहे.
संभाव्यत: इतर ३ जवानांचा मृत्यू पाण्यात बुडाल्याने झाला आहे. बाकी जवानांच्या शरीरावर हत्याराने मारहाण केल्याचे निशाण आहेत. तीन जवानांचे चेहरेही ओळखता येत नव्हते तर अन्य ३ जवानांच्या गळ्याभोवती वाळूचे घट्ट निशाण होते.
तसेच या जवानांना कोणी नखं मारल्याचं दिसत आहे. चीनी सैनिकांकडे चाकूदेखील होते, काही जवान उंचावरुन नदीत पडले. १४ हजार फूट उंचावर असणाऱ्या गलवान खोऱ्यात थंड प्रदेश आणि दुर्गम भाग असल्याने मदत मिळण्याअभावी त्या सैनिकांचा जीव गेला. १२ जखमी जवानांचा मृत्यू हायपोथर्मिया आणि श्वास रोखल्याने झाला असल्याचं पोस्टमोर्टममध्ये समोर आलं.
काय घडलं होतं?
सोमवारी सकाळी ब्रिगेड कमांडरसोबत स्थानिक कमांडर स्तरीय बैठक झाली. संध्याकाळी भारतीय लष्कारी अधिकाऱ्यांची टीम गलवान खोऱ्यात पीपी १४ याठिकाणी पोहचले ज्याठिकाणाहून चीनच्या सैनिकांना मागे जायचं होतं, भारतीय अधिकारी आणि त्यांच्या जवानांवर दगड आणि लोखंडाच्या रॉडने हल्ला केला. त्यामुळे भारतीय सैनिकांनीही सतर्कता बाळगत त्याला उत्तर दिलं. मोठ्या संख्येने भारताचे सैनिक त्याठिकाणी पोहचले, रात्री उशिरापर्यंत दोन्ही सैनिकात संघर्ष सुरु होता. यात घटनेत २० जवान शहीद झाले तर चीनच्या गंभीर जखमी पकडून साधारण ४३ सैनिकांचा मृत्यू झाल्याची बातमी मिळाली. या संघर्षामुळे चीनविरोधात भारतात संतप्त भावना आहे.