India China FaceOff: पँगाँग सरोवर परिसरात लष्कराने मजबूत पाय रोवले, भारताच्या जवानांनी चिन्यांना चहुबाजूंनी घेरले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 06:13 AM2020-09-02T06:13:13+5:302020-09-02T06:44:46+5:30
पँगाँग सरोवराच्या दक्षिण भागात चीनने जैसे थे परिस्थिती बदलण्याच्या केलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच या भागात आक्रमक राहण्याची सूचना केली आहे.
लेह (लडाख) - गेल्या चार महिन्यांपासून लाडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमध्ये सुरू असलेला तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. पँगाँग सरोवर परिसरात चिनी सैन्याच्या घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडल्यानंतर आता या भागात भारतीय लष्कराने आक्रमक धोरण अवलंबले आहे. तसेच पँगाँग सरोवराच्या दक्षिण भागात चीनने जैसे थे परिस्थिती बदलण्याच्या केलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच या भागात आक्रमक राहण्याची सूचना केली आहे.
दरम्यान, लडाखमधील रणनीतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावरील चारी बाजूला असलेल्या पर्वतांवर भारतील लष्कराने पाय रोवले आहेत. त्यामुळे या भागात घुसण्याचा प्रयत्न करत असलेल्या चीनची कोंडी झाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पँगाँग सरोवराच्या दक्षिण भागात भारताने अतिरिक्त जवानांना तैनात केले आहे. तसेच टँक, अँटीटँक गाइडेड क्षेपणास्रे मोर्चावर आणली आहेत. दरम्यान, २९ आणि ३० ऑगस्ट रोजी रात्री झालेल्या झटापटीत पँगाँग सरोवराच्या दक्षिण भागात चीनकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषा बदलण्याचा करण्यात आलेला प्रयत्न हाणून पाडण्यात आल्याची माहिती लष्कराने दिली होती.
दोन्ही देशांचे कमांडर दोन दिवसांपूर्वी या भागात निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी चर्चा करत असताना चिनी सैन्याकडून मात्र घुसखोरीचा प्रयत्न करून आगळीक करण्यात आली, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले. दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत झालेल्या बैठकीला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बीपीन रावत, लष्कर प्रमुख एमएम नरवणे आणि हवाईदलप्रमुख आर. के. एस. भदौरिया उपस्थित होते.
दरम्यान, या घटनेनंतर चिनी सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने भारताला उघड धमकी दिली आहे. भारताला आमच्याशी कोणतीही स्पर्धा करायची असल्यास त्यांना १९६२ पेक्षा जास्त नुकसान सहन करावे लागेल, असा इशारा ग्लोबल टाईम्सने दिला आहे.
भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने चिनी सैन्याचे घुसखोरीचे मनसुबे उधळले गेले. लडाखमधल्या पँगाँग सरोवरच्या दक्षिण किनाऱ्याजवळ भारत आणि चीनचे जवान भिडले. भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिल्याने चिनी सैन्याला घुसखोरी करता आली नाही. यानंतर चीन सरकारने पुन्हा एकदा बातचीत करून प्रश्न सोडवण्याची भाषा सुरू केली. तर चिनी सरकारच्या ग्लोबल टाईम्सने भारताला थेट धमकी दिली आहे.
ह्यभारतानं चिनी सैन्याला आधीच रोखले, असे भारताने म्हटले आहे. त्यामुळे भारतानेच आधी विध्वंसक पाऊल उचलले आणि संघर्षाची सुरुवात केली, हे स्पष्ट आहे. भारतामध्ये अनेक समस्या आहेत. रविवारी भारतात ७८ हजार कोरोना रुग्ण आढळले. त्यांच्या अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट आहे. त्यामुळे सीमावर्ती भागातील तणाव वाढवून भारत देशातील समस्यांवरून लक्ष विचलित करू पाहतोय,' असे ग्लोबल टाईम्सने संपादकीय लेखात म्हटले आहे.