India China FaceOff: कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज, लष्करप्रमुख मनोज नरवणे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 06:18 AM2020-09-05T06:18:02+5:302020-09-05T06:18:34+5:30
या भागातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी नरवणे गुरुवारपासून लडाखच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. चीनने पेंगाँग सरोवराच्या परिसरात केलेला घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावला होता.
लेह : लडाखलगतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव काही प्रमाणात वाढला असला तरी कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास भारतीय लष्कर सज्ज आहे, असा इशारा लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी चीनचे नाव न घेता शुक्रवारी दिला.
या भागातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी नरवणे गुरुवारपासून लडाखच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. चीनने पेंगाँग सरोवराच्या परिसरात केलेला घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावला होता. त्यानंतरही चीनकडून भारताच्या कुरापती काढण्याचे प्रकार सुरूच आहेत.
मनोज नरवणे यांनी सांगितले की, भारतीय जवानांचे मनोबल उंचावलेले असून, ते कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास तयार आहेत. सीमेवरील स्थिती लक्षात घेता भारताने स्वत:च्या रक्षणासाठी योग्य उपाययोजना केलेल्या आहेत. देश सुरक्षित राहण्यासाठी व सार्वभौमत्व टिकविण्यासाठी हे पाऊल आवश्यक आहे. नरवणे म्हणाले की, भारतीय लष्करातील प्रत्येक जवान व अधिकारी हे उत्कृष्ट दर्जाचे आहेत. त्यांची कामगिरी केवळ लष्करासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशाकरिता गौरवास्पद ठरणार आहे. लष्करप्रमुख मनोज नरवणे म्हणाले की, लडाखमधील लेह या शहरात पोहोचल्यानंतर मी सर्व लष्करी अधिकाऱ्यांशी सीमेवरील परिस्थितीबाबत चर्चा केली, तसेच लष्कराने केलेल्या संरक्षण सज्जतेचाही आढावा घेतला.
चीनकडून आगळीक सुरूच
आयटीबीपी प्रमुख एस एस देसवाल देखील गेल्या सहा दिवसांपासून लद्दाखमध्ये आहेत. दर तासाला ते तैनात सैनिकांकडून अहवाल घेतात. पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाºयावर स्वहद्दीत भारताने २ हजारांपेक्षाही जास्त आयटीबीपी जवान तैनात केले आहेत.
भारताने मात्र आता मोक्याच्या जागी सैन्य तैनात केल्याने ड्रॅगनला धडकी भरली. या भागात चीननेदेखील स्वहद्दीत विध्वंसक टँक, रडार यंत्रणा कार्यान्वित केली. भारताकडूनही लढाऊ टँक पुढे नेण्यात आले आहेत.