लडाखमध्ये अत्याधुनिक सुविधा; कडाक्याच्या थंडीत चीनला घाम फोडण्यास जवान सज्ज
By कुणाल गवाणकर | Published: November 18, 2020 04:46 PM2020-11-18T16:46:45+5:302020-11-18T16:53:06+5:30
संपूर्ण हिवाळा लडाखमध्ये मुक्काम करण्याची तयारी; भारतीय जवानांना अत्याधुनिक सुविधा मिळणार
नवी दिल्ली: उन्हाळ्यापासून सुरू असलेला पूर्व लडाखमधील तणाव आजही कायम आहे. आता थंडीच्या दिवसात पारा घसरणार असल्यानं लडाखमध्ये तग धरणं दिवसागणिक अवघड होत जाणार आहे. त्यामुळे हिवाळ्यासाठी भारतीय लष्करानं विशेष तयारी केली आहे. पूर्व लडाखमध्ये दरवर्षी ४० फूट बर्फ पडतो. याशिवाय तापमान उणे ३० ते ४० अंशांपर्यंत घसरतं. त्यामुळे हिवाळ्यात चिनी सैन्याच्या आगळिकींचा सामना करण्यासाठी भारतीय जवान सज्ज झाले आहेत.
हिवाळ्यात पूर्व लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होते. पारा प्रचंड घसरत असल्यानं या भागात तग धरून राहणं अतिशय आव्हानात्मक असतं. चीननं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ रस्त्यांची कामं सुरू केली आहेत. त्यामुळे हिवाळ्यात सीमावर्ती भागातील वातावरण तापण्याची चिन्हं आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याच्या मुक्कामासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जवानांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यादृष्टीनं पूर्ण तयारी करण्यात आली आहे.
#WATCH Eastern Ladakh: In order to ensure operational efficiency of troops deployed in winters, Indian Army has completed establishment of habitat facilities for all troops deployed in the sector. pic.twitter.com/H6Sm5VG541
— ANI (@ANI) November 18, 2020
हिवाळ्यात पारा घसरल्यानंतरही उबदार राहू शकेल, अशा प्रकारची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी गरम पाण्यासह विजेची सोयदेखील उपलब्ध आहे. जवानांच्या आरोग्याचा विचार करून स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात आलं आहे. भारतीय लष्करानं आज एका निवेदनाच्या माध्यमातून याबद्दलची माहिती दिली. 'जवानांच्या कारवायांची क्षमता वाढवण्यासाठी पूर्व लडाखमधील वास्तव्याची सुविधा अत्याधुनिक करण्यात आली आहे,' असं लष्करानं सांगितलं आहे.
५ मेपासून पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये संघर्ष सुरू आहे. पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात केला आहे. १५ जूनला दोन्ही सैन्यामध्ये हिंसक झटापट झाली होती. त्यात भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीनचंही मोठं नुकसान झालं. यानंतर चीनला धडा शिकवण्यासाठी केंद्र सरकारनं सुरक्षेच्या कारणास्तव अनेक ऍप्सवर बंदी घातली. यामध्ये बहुतांश ऍप्स चिनी कंपन्यांचे होते.