India China FaceOff: "मोदींनी जपून बोलावे, अन्यथा चीनच्या कुटिलतेस बळ मिळेल"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 03:40 AM2020-06-23T03:40:01+5:302020-06-23T03:40:23+5:30
चीनच्या कुटिल कारस्थानांना बळ मिळेल असे बोलणे टाळावे, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी सोमवारी दिला.
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : सीमेवर तणाव निर्माण झालेला असताना सध्याची वेळ संपूर्ण देशाने एकजूट होऊन चीनच्या दु:साहसास कणखरपणे उत्तर देण्याची आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याविषयी जपून बोलावे आणि चीनच्या कुटिल कारस्थानांना बळ मिळेल असे बोलणे टाळावे, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी सोमवारी दिला.
पंतप्रधान व केंद्र सरकारने काळाचे आव्हान स्वीकारून राष्ट्रीय सुरक्षा व अखंडतेसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या कर्नल संतोष बाबू व अन्य भारतीय सैनिकांच्या बलिदानाच्या कसोटीवर उतरावे. यात जराही कुचराई करणे म्हणजे जनादेशाचा ऐतिहासिक विश्वासघात ठरेल, असेही माजी पंतप्रधानांनी म्हटले आहे. भारत चीनच्या धमक्यांपुढे कधीही झुकणार नाही आणि भौगोलिक अखंडतेशी कधीही तडजोड करणार नाही, असे नमूद करून निवेदनात ते लिहितात की, आज देश इतिहासाच्या एका नाजूक वळणावर उभा आहे. या घडीला आपले सरकार काय निर्णय घेते व कोणती पावले उचलते यावर भावी पिढ्या मूल्यमापन करणार आहेत. हे कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी देशाच्या नेतृत्वाच्या खांद्यावर आहे. आपल्या लोकशाहीत ही जबाबदारी पंतप्रधानांची आहे. जाहीर वक्तव्यांनी देशाची सुरक्षा, अखंडता यावर प्रभाव पडू शकतो याची जाणीव ठेवून पंतप्रधानांनी सावध राहायला हवे.
>सत्य कधीही दडपले जाऊ शकत नाही
चीनसोबत सीमेवर संघर्ष होऊन २० भारतीय जवानांना हौतात्म्य आल्यानंतर प्रथमच प्रसिद्ध केलेल्या निवेदनात डॉ. मनमोहनसिंग यांनी म्हटले आहे की, भ्रामक प्रचार कधीही कूटनीती व खंबीर नेतृत्वाला पर्याय होऊ शकत नाही. तसेच स्तुतिपाठकांनी असत्याचे अवडंबर माजविले तरी त्याने सत्य कधीही दडपले जाऊ शकत नाही.