India China FaceOff: एलएसीवरील तणावादरम्यान ब्रिक्स संमेलनात मोदी आणि जिनपिंग येणार आमने-सामने
By बाळकृष्ण परब | Published: October 5, 2020 09:07 PM2020-10-05T21:07:14+5:302020-10-05T21:09:42+5:30
भारत आणि चीनमध्ये तणाव निवळण्यासाठी विविध पातळीवरील बैठका झाल्या आहेत. आता या तणावाच्या वातावरणामध्येच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे आमने-सामने येणार आहेत.
नवी दिल्ली - चिनी सैन्याने लडाखमध्ये केलेला घुसखोरीचा प्रयत्न आणि गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीमुळे भारत आणि चीनमधील संबंध सध्या कमालीचे तणावपूर्ण बनलेले आहेत. दोन्ही देशांमधील तणाव निवळण्यासाठी विविध पातळीवरील बैठका झाल्या आहेत. आता या तणावाच्या वातावरणामध्येच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे आमने-सामने येणार आहेत.
कोरोनाच्या संसर्गामुळे १२ वे ब्रिक्स शिखर संमेलन यावेळी व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणार आहे. हे संमेलन १७ नोव्हेंबर रोजी होणार असून, मिळालेल्या माहितीनुसार प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. सीमेवर कमालीचे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमधील भेटीची ही पहिलीची वेळ असेल. ही भेट व्हिडीओ कॉन्फ्रन्सिंगच्या माध्यमातून व्हर्च्युअल पद्धतीने आयोजित होईल.
या वर्षीच्या ब्रिक्स शिखर संमेलनामधील बैठकीचा विषय जागतिक स्थैर्य, संयुक्त संरक्षण आणि अभिनव विकासामध्ये ब्रिक्सची भागीदारी हा आहे. २०२० मध्ये या संघटनेतील पाच प्रमुख देशांनी शांतता आणि संरक्षण, अर्थव्यवस्था आणि वित्त, सांस्कृतिक आणि देवाण-घेवाणीवरील भागीदारी कायम ठेवली आहे.
दरम्यान, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचे सल्लागार अँटोन कोबायाकोव्ह यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या फैलावामुळे जागतिक पातळीवर चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असली तरी २०२० मध्ये रशियाच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्सचे संमेलन अत्यंत सुसंगत पद्धतीने आयोजित केले जात आहे.
दुसरीकडे भारत आणि चीनमधील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र या परिस्थितीतही चीनच्या प्रत्येक कारस्थानाला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाने सतर्कता वाढवली आहे. अशा परिस्थितीत चिनी सेनेला माघार घेण्यास लावण्यासाठी तसेच चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर ताकद वाढवण्याच्या करारापासून मागे हटत असेल तर अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठीही भारताने तयारी केली आहे.