India China Faceoff: भारत-चीन सैन्यातील हिंसक झटापटीनंतर पंतप्रधान मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 02:01 PM2020-06-17T14:01:06+5:302020-06-17T14:01:54+5:30
India China Faceoff: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलविली आहे.
नवी दिल्लीः लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेला तणाव आता शिगेला पोहोचला आहे. गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत कमांडिंग ऑफिसरसह 20 भारतीय सैनिकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती भारतीय सैन्याने एका निवेदनाद्वारे दिली आहे. या संघर्षात चीनलाही खूप नुकसान सहन करावं लागलं आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे आणि मुत्सद्देगिरीच्या पातळीवर तो सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलविली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनबरोबर सुरू असलेल्या वादावर सर्वपक्षीय बैठक बोलविली आहे. १९ जून रोजी संध्याकाळी पाच वाजता सर्व पक्षांचे प्रमुख आभासी बैठकीद्वारे यात सहभागी होणार आहेत. या विषयावर विरोधी पक्षांकडून सर्वपक्षीय बैठक बोलविण्याची सतत मागणी होत होती. त्याच पार्श्वभूमीवर मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे सोमवारी रात्री गॅलवान खो-यात भारत आणि चीनच्या सैन्यात हिंसक चकमक झाली. या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले. याखेरीज भारताच्या चार जवानांची परिस्थिती गंभीर आहे. लष्कराने याची खातरजमा केलेली आहे. त्याचवेळी या हिंसक चकमकीत चिनी सैन्याचंही मोठं नुकसान झालं आहे. भारत-चीन सीमेवर हौतात्म्य आलेल्या आपल्या 20 जवानांची नावे आज जाहीर करण्यात येणार आहे. चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत या जवानांना हौतात्म्य आले आहे. ही घटना 15-16 जूनदरम्यानच्या रात्री घडली होती. भारतीय सैनिकांचे पथक कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू यांच्या नेतृत्वात चिनी कॅम्पमध्ये गेले होते. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे शस्त्र नव्हते. हे पथक चिनी सैन्याच्या मागे हटण्याच्या मुद्यावर झालेल्या सहमतीसंदर्भात बोलणी करण्यासाठी गेले होते.In order to discuss the situation in the India-China border areas, Prime Minister @narendramodi has called for an all-party meeting at 5 PM on 19th June. Presidents of various political parties would take part in this virtual meeting.
— PMO India (@PMOIndia) June 17, 2020
मात्र, तेथे भारतीय जवानांना चिनी सैनिकांनी दगा दिला. दगड, काटेरी तारा आणि खिळे असलेल्या काठ्यांनी चिनी सैनिकांनी या पथकावर हल्ला केला. यात कमांडिग ऑफिसर कर्नल संतोष बाबू आणि दोन जवान तेथेच शहीद झाले. तर अनेक जवान जखमी झाले. ज्या ठिकाणावर ही चकमक झाली त्याच्या खालून श्योक नदी वाहते. अनेक सैनिक या नदीत वाहून गेल्याचेही वृत्त आहे. भारताने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात 20 जवानांना हौतात्म्य आल्याचे म्हटले आहे.