'जुना मित्र' येणार भारताच्या कामी; चिनी दबाव झुगारून भारताला 'ब्रह्मास्त्र' देण्याची हमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 11:00 AM2020-06-24T11:00:55+5:302020-06-24T11:05:25+5:30
भारताला एस-४०० यंत्रणा लवकरात लवकर देण्याचं रशियाचं आश्वासन
मॉस्को: दीड महिन्यांपासून लडाखमध्ये चीनसोबत निर्माण झालेला वाद, त्यानंतर गेल्याच आठवड्यात गलवानमध्ये झालेली झटापट यामुळे सीमेवरील तणाव वाढला आहे. भारत आणि चीननं सीमेवरील फौजफाटा वाढवला आहे. चीनच्या कोणत्याही आगळिकीला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज झालं आहे. सरकारनं लष्कराला फ्री हँड दिला आहे. त्यामुळे आता गोळीबार करण्याचे आदेश फिल्ड कमांडरकडून दिले जातील. सीमेवरील शस्त्रास्त्रं सज्जता वाढवण्याचे प्रयत्न करणाऱ्या भारताला रशियानं मोठा दिलासा दिला आहे.
लडाख सीमेवरील तणाव वाढत असताना रशियानं भारताला एस-४०० लवकरात लवकर देण्याचं आश्वासन दिलं आहे. एस-४०० जगातील सर्वात आधुनिक हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र यंत्रणा आहे. चीनसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रशियाच्या दौऱ्यावर आहेत. रशियाचे उपपंतप्रधान युरी इवानोविक बोरिसोव यांनी एस-४०० यंत्रणा लवकरात लवकर भारताला देण्यात येईल, असं आश्वासन दिलं आहे. रशियानं भारताला शस्त्रास्त्रं पुरवठा करू नये, असं आवाहन चिनी सरकारच्या पीपल्स डेली वृत्तपत्रानं केलं होतं. मात्र चीननं निर्माण केलेला दबाव रशियानं झुगारला आहे.
भारतासोबत केलेले करार लवकरात लवकर पूर्ण केले जातील, असं आश्वासन रशियाकडून देण्यात आल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी उपपंतप्रधान युरी इवानोविक बोरिसोव यांच्यासोबतच्या बैठकीनंतर दिली. 'रशियाच्या उपपंतप्रधानांसोबतची चर्चा अतिशय सकारात्मक झाली. कोरोना संकट काळातही रशिया आणि भारतामधील दृढ संबंध कायम आहेत. आधी करण्यात आलेले करार कायम राहतील. याशिवाय काही नव्या गोष्टीही कमीत कमी कालावधीत पूर्ण केल्या जातील,' असं सिंह म्हणाले.
भारत सरकारनं एस-४०० क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा लवकर देण्याचा आग्रह केला होता. त्याला रशिया सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिला, असं वृत्त रशियन वृत्तपत्र स्पुटनिकनं दिलं आहे. जगातील सर्वात आधुनिक हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र यंत्रणा असलेल्या एस-४०० साठी भारतानं रशियासोबत २०१८ मध्ये करार केला. हा करार ४० हजार कोटी रुपयांचा आहे. भारताला एस-४०० यंत्रणेच्या चार युनिट्स मिळतील. याशिवाय भारत रशियाकडून ३१ लढाऊ विमानंदेखील खरेदी करणार आहे. टी-९० रनगाड्यांच्या सुट्ट्या भागांसाठी रशिया आणि भारतात चर्चा सुरू आहे.
चीनच्या कारवायांची थक्क करणारी गती; भारताशी पंगा घेणाऱ्या नेपाळला सतावतेय वेगळीच भीती
भारत-चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये १२ तास बैठक; भारतानं स्पष्ट शब्दांत सुनावलं
नाद करा, पण आमचा कुठं! भारतीय जवानांनी थेट चिनी अधिकाऱ्याला उचललं
चीन युद्धाच्या तयारीत?; लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत हवाई दलाच्या हालचाली