India China Faceoff: झटापट झालेल्या भागात चीननं उभारले १६ कॅम्प; ड्रॅगन मोठ्या घुसखोरीच्या प्रयत्नात? 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 08:04 AM2020-06-28T08:04:34+5:302020-06-28T08:10:20+5:30

गलवान खोऱ्यात चिनी सैनिक मोठ्या संख्येनं तैनात; चीन माघार घेत नसल्यानं तणाव वाढण्याची शक्यता

India China Faceoff satellite photos shows 16 Chinese Camps Near LAC Galwan River | India China Faceoff: झटापट झालेल्या भागात चीननं उभारले १६ कॅम्प; ड्रॅगन मोठ्या घुसखोरीच्या प्रयत्नात? 

India China Faceoff: झटापट झालेल्या भागात चीननं उभारले १६ कॅम्प; ड्रॅगन मोठ्या घुसखोरीच्या प्रयत्नात? 

Next

नवी दिल्ली: पूर्व लडाखमधल्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमधील तणाव वाढला आहे. त्यातच आता गलवान नदीच्या खोऱ्यातील चिनी सैन्याच्या हालचाली वाढल्यानं संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे. गलवान नदीच्या खोऱ्यात अनेक ठिकाणी तंबू उभारण्यात आल्याचं उपग्रहांमधून टिपण्यात आलेल्या छायाचित्रांमधून दिसून येत आहे. त्यामुळे या भागात चिनी सैन्य मोठ्या प्रमाणात तैनात असल्याचं सिद्ध झालं आहे.

नऊ किलोमीटरच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चिनी लष्कराचे किमान १६ कॅम्प आहेत. त्यामुळे चीन मागे हटायला तयार नसल्याचं स्पष्ट दिसतं आहे. उलट चीननं या भागातील सैनिकांची संख्या वाढवली आहे. त्यामुळे भारतीय जवानांना असलेला धोका वाढला आहे. एनडीटीव्हीनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. २२ जूनला भारत आणि चीनच्या लेफ्टनंट जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. त्यामध्ये पूर्व लडाखमधील वादग्रस्त भागातील तणाव निवळण्यासाठी सैन्य मागे घेण्याबद्दल एकमत झालं.



लेफ्टनंट जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी चीननं अद्याप तरी सुरू केलेली नाही. प्लॅनेट लॅब्सनं दिलेल्या उपग्रह छायाचित्रांनुसार प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीन सैन्य मोठ्या संख्येनं एकत्र आल्याचं दिसतं आहे. १५ जूनला याच ठिकाणी चिनी सैन्यानं भारतीय जवानांवर हल्ला केला होता. त्यात एका कर्नलसह २० जवान शहीद झाले. या झटापटीत चीनचे जवळपास ४५ सैनिक मारले गेले. मात्र चीननं अद्याप मृत सैनिकांचा आकडा प्रसिद्ध केलेला नाही.



गलवान खोऱ्यातील चिनी सैन्याची वाढती संख्या याबद्दल अद्याप भारतीय लष्करानं कोणतंही भाष्य केलेलं नाही. चीननं गलवान नदीच्या एका तीव्र वळणावर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केलं आहे. त्यामुळे चीनला भारतीय चौक्यांवर लक्ष ठेवणं अतिशय सोपं आहे. चिनी सैन्य तैनात असलेल्या भागापासून दौलत बेग ओल्डीची हवाईपट्टी ६ किलोमीटरवर आहे. या भागात चीननं तैनात केलेल्या सैनिकांची संख्या पाहता त्यांच्याकडून पुन्हा  घुसखोरीचा प्रयत्न होण्याची दाट शक्यता आहे. 

Web Title: India China Faceoff satellite photos shows 16 Chinese Camps Near LAC Galwan River

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.