India China FaceOff: आपल्या हद्दीत राहा! भारताने चीनला खडसावले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 07:23 PM2020-06-18T19:23:36+5:302020-06-18T19:28:17+5:30
देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेबाबत कुठलीही तडजोड करण्यात येणार नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. तसेच चीनने आपल्या हालचाली आपल्या हद्दीतच मर्यादित ठेवाव्यात
नवी दिल्ली - लडाखमधील गलवान क्षेत्रात झालेल्या झटापटीनंतर भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झालेला आहे. या तणावाच्या वातावरणादरम्यान, देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेबाबत कुठलीही तडजोड करण्यात येणार नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. तसेच चीनने आपल्या हालचाली आपल्या हद्दीतच मर्यादित ठेवाव्यात, असे भारताने चीनला सुनावले आहे.
भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले की, द्विपक्षीय मतभेदांबाबत शांततापूर्ण मार्गाने तोडगा निघावा, असे भारताचे मत आहे. मात्र परिस्थितीनुसार प्रत्येक प्रकारची कारवाई करण्यास भारत तयार आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने आज वंदे भारत मिशनबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली होती. मात्र यावेळी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांवर प्रसारमाध्यमांकडून सध्या भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या वादाबाबत प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. तेव्हा अनुराग श्रीवास्तव म्हणाले की, सीमाभागांमध्ये शांतता आणि सौहार्दाचे वातावरण कायम राहण्याचे महत्त्व आम्हाला माहीत आहे. तसेच सर्व मतभेदांचे चर्चेच्या माध्यमातून निराकरण व्हावे, असे आम्हाला वाटते. मात्र काल पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडत्व अबाधित राखण्यासाठी कटीबद्ध आहोत.’’
While we remain convinced of the need for maintenance of peace & tranquillity on border areas & resolution of differences through dialogue, at the same time as PM said yesterday, we are strongly committed to ensuring India's sovereignty & territorial integrity: MEA Spokesperson pic.twitter.com/yhkeCrkZ2O
— ANI (@ANI) June 18, 2020
सीमारेषेवर चीनने आपल्या हालचाली, त्यांच्या सीमेच्या मर्यादेत राहून करेल, अशी अपेक्षा आम्ही बाळगतो. भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय संवाद अद्याप थांबलेला नाही. विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. त्याअंतर्गत दोन्ही देशांमध्ये आज मेजर जनरल स्तरावरील बैठक झाली. ही बैठक सुमारे सहा तास चालली. मात्र त्यातून काही तोडगा निघाला नाही.