India China FaceOff: भारत-चीनमध्ये तिसऱ्या दिवशीही तणावपूर्ण चर्चा, भारताने दिला ड्रॅगनला तिसरा झटका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 04:00 AM2020-09-03T04:00:53+5:302020-09-03T04:01:34+5:30
आर्थिक, राजनैतिक, आंतरराष्ट्रीय व्यापारात चीनला भारतात अत्यंत कठोर निर्बंधांचा सामना यापुढेही करावा लागेल. चुशुल चेक पॉर्इंटवर लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
नवी दिल्ली : ईशान्य लद्दाख सीमेवरून भारतीय हद्दीत घुसखोरीचा चिनी सैनिकांचा डाव हाणून पाडल्यानंतर या भागातील तणाव अजूनही कायम आहे. भारतीय जवान आपल्या जागेपासून तसूभरही मागे हटले नसून सलग तिस-या दिवशी भारत-चीनदरम्यान कमांडर स्तरावरील चर्चा पार पडली. अद्याप चर्चेतून काहीही निष्पन्न झाले नसले तरी भारताने पुन्हा एकदा ड्रॅगनला झटका दिला आहे. माहिती व दूरसंचार मंत्रालयाने पबजीसह एकूण १०८ चिनी अॅपवर बंदी घातली आहे.
आर्थिक, राजनैतिक, आंतरराष्ट्रीय व्यापारात चीनला भारतात अत्यंत कठोर निर्बंधांचा सामना यापुढेही करावा लागेल. चुशुल चेक पॉर्इंटवर लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. सलग दोन दिवस ही चर्चा निष्कर्षाविना संपली. पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाºयावरून पुढे सरकणाºया चीनी सैनिकांना भारतीय जवानांनी मागे पिटाळले. तेव्हापासून ड्रॅगन चवताळला आहे. विशेष म्हणजे असे काही झाल्याच्या वृत्ताचा इन्कार चीनी परराष्ट्र मंत्रालयाने केल्यानंतर अवघ्या काही तासांच्या आताच पीपल्स लिबरेशन आर्मीने भारतीय जवानांनी चीनी हद्देत प्रवेश केल्याचा कांगावा केला. त्यामुळे आता सरकार, चीनी कम्युनिस्ट पक्ष व पीएलएमधील संवादाचा अभाव जगासमोर आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पीएलएच्या निवेदनानंतर लगेचच भारताकडे राजनैतिक, सीमा संरक्षण व सार्वभौमत्त्वाचे रडगाणे गायले. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने मात्र आपल्या लष्करी कारवाईचे समर्थन करताना पीएलएनेच सीमास्थिती (स्टेट्स को) बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.
गेल्या तीन दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये सीमाप्रश्नावरून तणाव वाढला आहे. मात्र चीनी राजदूत सन वेईदूंग भारतीय विद्यार्थी, अभ्यासकांशी संवाद साधत आहेत. विशेष म्हणजे चीनमध्ये शिकण्यासाठी तेथील सरकारने यंदाही ३८ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. तशी घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने केली. सीमेवरून तणाव असला तरी सॉफ्ट डिप्लोमसीसाठी दोन्ही देश अनुकूल आहेत.
सीमा प्रश्नावरून चर्चेत गुंतवून पुन्हा घुसखोरी करण्याचा चीनचा कुटील डाव भारताने आधीच ओळखला होता. गेल्या आठवडाभरापासून लष्करप्रमुख, परराष्ट्र मंत्री सातत्याने चीनच्या इराद्यावर प्रश्न लावत होते. त्याचीच प्रचिती या आठवड्यात आल्याने भारताने युद्धसज्जता केली आहे.
संरक्षणमंत्री राजनाथसिंह तीन दिवस रशिया दौºयावर
‘शांघाय सहकार्य परिषदे’तील (एससीओ) आठ सदस्य देशांच्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीसाठी संरक्षणमंत्री राजनाथसिंह बुधवारी तीन दिवसांच्या रशिया दौºयावर रवाना झाले. मुख्य बैठक शुक्रवारी मॉस्कोमध्ये होणार आहे.
भारत व चीन यांच्यात पूर्व लडाख सीमेवर तणातणी सुरू असताना ही बैठक होणार आहे. चीनचे संरक्षणमंत्री जनरल वेई फेंगे व पाकिस्तानचे संरक्षणमंत्री परवेज खट्टक हेही बैठकीला उपस्थित राहणार असले तरी राजनाथसिंह यांचा त्यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करण्याचा कोणताही कार्यक्रम नाही, असे सरकारी प्रवक्त्याने सांगितले.
मात्र, राजनाथसिंह रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शॉईगो यांच्याशी संरक्षण क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध व सहकार्य अधिक बळकट करण्यासंदर्भात चर्चा करतील. एके-४०३ रायफल्सचे भारतात उत्पादन करण्यासाठीचा करार यावेळी होईल, असे समजते. तसेच आधी झालेल्या खरेदी करारानुसार रशियाने ‘एस-४००’ क्षेपणास्त्र यंत्रणा लवकर द्यावी, असाही आग्रह भारत घरेल.