India Chine Faceoff : एलएसीवर तणाव सुरूच, दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांची आज बैठक
By ravalnath.patil | Published: September 21, 2020 07:58 AM2020-09-21T07:58:49+5:302020-09-21T08:00:39+5:30
भारतीय लष्कराचे प्रतिनिधी म्हणून मेजर जनरल पद्म शेखावत आणि चिनी सैन्याचे अधिकारी मेजर जनरल लिन लियू यांच्यात ही बैठक होणार आहे.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून एलएसीवर भारत - चीन यांच्यात सुरू असलेला तणाव अद्यापही निवळलेला नाही. याच पार्श्वभूमीवर भारत आणि चीन यांच्यात पुन्हा आज कॉर्प्स कमांडर स्तरावर बैठक होणार आहे. ही बैठक चीनच्या भागात होणार आहे.
सकाळी ११ च्या सुमारास सुरू होणाऱ्या या बैठकीत नवीन चेहरे सुद्धा सामील होण्याची शक्यता आहे. भारतीय लष्कराचे प्रतिनिधी म्हणून मेजर जनरल पद्म शेखावत आणि चिनी सैन्याचे अधिकारी मेजर जनरल लिन लियू यांच्यात ही बैठक होणार आहे. मात्र, या बैठकीदरम्यान परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिवही यामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीदरम्यान भारताकडून चीनला टाइमलाइननुसार सर्व भागांतून सैन्य माघार घेण्यास सांगितले जाईल. तसेच, डेप्सांग ते पँगोंग येथील चिनी सैन्याच्या तैनाती हटविण्यास सांगितले जाईल.भारतीय लष्कराला कोणत्याही अडथळ्याशिवाय सर्व पेट्रोल पॉईंटवर प्रवेश देण्यास सांगितले जाईल.
याशिवाय, मॉस्कोमध्ये दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान ठरविलेल्या पाच सहमती मुद्यांचे काटेकोरपणे पालन करण्याची मागणी केली जाईल. याचबरोबर, एलएसीवर सैन्याची तैनाती आणि सैन्याची संख्या वाढविण्यासंदर्भातील प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले जाईल. त्याठिकाणी फक्त डिसएंगेजमेंट नाही तर डीइंडक्शनसाठी सुद्धा सांगितले जाईल.
दरम्यान, लडाखमध्ये एलएसीवर भारत आणि चीनमध्ये तणाव कायम आहे. सीमेवर गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी याआधी सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला दोन्ही देशातील सैन्यात ब्रिगेड-कमांडर स्तरावर चुशूल येथे बैठक झाली होती. पण ही बैठक निष्फळ ठरली होती. आता होणारी कॉर्प्स कमांडर-स्तरावरील ही सहावी बैठक असणार आहे,