India China FaceOff: चीन भारताला वारंवार १९६२ची आठवण का करून देतो? त्यावेळी भारतानं नक्की काय गमावलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 03:16 PM2020-09-01T15:16:53+5:302020-09-01T15:19:58+5:30

गेल्या काही महिन्यांपासून सीमेवरील तणाव वाढला असताना चीन भारताला १९६२ ची आठवण करून देतोय. त्यामागचं नेमकं कारण काय..?

India China FaceOff what india lost in 1962 war why china always says india needs to remember lessons from past | India China FaceOff: चीन भारताला वारंवार १९६२ची आठवण का करून देतो? त्यावेळी भारतानं नक्की काय गमावलं?

India China FaceOff: चीन भारताला वारंवार १९६२ची आठवण का करून देतो? त्यावेळी भारतानं नक्की काय गमावलं?

Next
ठळक मुद्देपूर्व लडाखमध्ये भारत-चीनच्या सैन्यात गेल्या ४ महिन्यांपासून तणावचीनकडून भारताला वारंवार १९६२ च्या युद्धाची आठवणतुमची अवस्था १९६२ पेक्षा वाईट होईल; चीनचा भारताला अनेकदा इशारा

भारत आणि चीनमध्ये गेल्या ४ महिन्यांपासून पूर्व लडाखमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या दरम्यान चीननं दोन वेळा घुसखोरीचा प्रयत्न केला. पण दोन्ही वेळा भारतीय जवानांनी चीनचा प्रयत्न हाणून पडला. १५ जूनला चिनी सैन्यानं पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात आगळीक केली. तिला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. चिनी सैन्याचा सामना करताना भारताच्या २० जवानांना वीरमरण झालं. तर चीनचं भारतापेक्षा जास्त नुकसान झालं. मात्र त्यांनी अद्याप मृत सैनिकांचा आकडा जाहीर केलेला नाही. 

...म्हणून भारत-चीनसाठी महत्त्वपूर्ण आहे गलवान खोरे

पेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स' म्हणजे नेमकं आहे तरी काय? ज्यांच्यामुळे भारत-चीन आले 'आमने-सामने'

याआधी २०१७ मध्ये डोकलाम भागात भारत आणि चिनी सैन्य आमनेसामने आलं होतं. तेव्हापासून चीननं वारंवार भारताला १९६२ ची आठवण करून दिली आहे. १९६२ पेक्षा जास्त नुकसान होईल, अशी धमकी चीन आणि चिनी माध्यमं वारंवार भारताला देत आहेत. त्यामुळे १९६२ मध्ये नेमकं काय झालं, त्यात भारतानं काय गमावलं, हे समजून घेणं गरजेचं आहे.

...तर १९६२ पेक्षा जास्त नुकसान होईल; घुसखोरीत अपयशी ठरलेल्या चीनची भारताला धमकी 

भारत-चीन युद्ध नेमकं कधी सुरू झालं? कोणाचं किती नुकसान झालं?
भारत-चीनमध्ये २० ऑक्टोबर १९६२ रोजी युद्ध सुरू झालं. जवळपास महिनाभर युद्ध सुरू होतं. यामध्ये चीनचे ७२२ सैनिक मारले गेले. तर जखमी झालेल्या सैनिकांची संख्या १ हजार ६९७ इतकी होती. चीनच्या तुलनेत भारताचं नुकसान मोठं होतं. भारताच्या १ हजार ३८३ जवानांना युद्धात वीरमरण आलं. भारताचे १ हजार ६९६ जवान बेपत्ता झाले. तर १ हजार ४७ जवान पकडले गेले. भारताचा जवळपास ४५ हजार चौरस किमी भाग चीनच्या ताब्यात गेला. मात्र दौलत बेग ओल्डीची हवाई पट्टी भारताकडे राहिली. या हवाईपट्टीचं सामरिक महत्त्व खूप मोठं आहे. तिचं भौगोलिक स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे.

दौलत बेग ओल्‍डी : जगातील सर्वात उंचावरची हवाई पट्टी, चीनच्या डोळ्यात खुपतेय भारताची 'सर्वोच्च' शक्ती

युद्धाला सुरुवात कोणी केली?
चीनमुळे युद्धाला तोंड फुटलं असा भारताचा दावा आहे. तर भारताच्या 'फॉरवर्ड पॉलिसी'मुळे युद्धाची ठिणगी पडल्याचा चीनचा दावा आहे. भारतानं सीमावर्ती भागातील सैन्याची संख्या वाढवल्यानं युद्धाला सुरुवात झाल्याचं चीन कायम म्हणत आला आहे. भारताला धडा शिकवण्यासाठी चीननं युद्ध पुकारल्याचं भारताचे इराकमधील राजदूत आर. एस. काल्हा यांनी एक लेखात म्हटलं आहे. 'भारताची मग्रुरी आणि त्यांचा भ्रम दूर करण्यासाठी आम्ही त्यांच्यावर हल्ला केला, असं चीनचे तत्कालीन अध्यक्ष लिऊ शाओकी यांनी श्रीलंकेचे नेते फेलिक्स बंदारनायके यांना सांगितलं होतं,' असं काल्हा यांनी इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स अँड ऍनालिसिससाठी लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे.

चीनकडून करण्यात आलेला हल्ला नियोजित होता?
चीनकडून पुकारण्यात आलेलं युद्ध नियोजित असल्याचा उल्लेखदेखील काल्हा यांनी लेखात केला आहे. 'सीमेवरील सर्व सेक्टर्समध्ये चीननं एकाचवेळी हल्ले सुरू केले. पश्चिम आणि पूर्व भागात २० ऑक्टोबरला पहाटे ५ वाजता एकाचवेळी हल्ले सुरू झाले,' असा तपशील काल्हा यांनी लेखात दिला आहे. 

युद्ध सुरू झालं त्यावेळी नेहरू आणि कृष्णा मेनन कुठे होते?
संरक्षणमंत्री कृष्ण मेनन संयुक्त राष्ट्राच्या अधिवेशनासाठी १७ सप्टेंबर १९६२ रोजी न्यूयॉर्कला रवाना झाले होते. ते ३० सप्टेंबर १९६२ रोजी परतले. तर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू राष्ट्रकुल देशाच्या पंतप्रधानांच्या परिषदेला जाण्यासाठी ८ सप्टेंबरलाच दिल्लीबाहेर पडले होते. ते १६ ऑक्टोबर १९६२ रोजी दिल्लीला परतले. तर लेफ्टनंट जनरल कौल काश्मीरमध्ये सुट्टी घालवण्यासाठी गेले होते.

हवाई दलाचा वापर न करण्याचा निर्णय
भारतानं चीनविरुद्धच्या युद्धात हवाई दलाचा वापर केला नव्हता. त्यामुळेच भारताचा पराभव झाल्याचं जागतिक घडामोडींचे जाणकार सांगतात. जवळपास महिनाभर चाललेल्या युद्धात भारतानं केवळ लष्कराचा वापर केला.

'राजकीय नेतृत्त्व आणि लष्करात पुरेसा संवाद नव्हता. त्यावेळी लष्करी नेतृत्त्वाशी संवाद साधण्यात राजकीय नेतृत्त्व कमी पडलं. चीन भारतावर हल्ला करणार नाही, असं नेहरूंना वाटत होतं,' असं निवृत्त एअर कमांडर रमेश फडकेंनी एका लेखात म्हटलं आहे.

भारतानं मागितली होती अमेरिकेची मदत
तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी अमेरिकेचं सहकार्य मागितलं होतं. चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी लढाऊ विमानं पाठवा, असं आवाहन अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांना नेहरूंनी केलं होतं. अमेरिकच्या गुप्तचर यंत्रणेचे माजी अधिकारी ब्रुस रिडेल यांनी त्यांच्या 'जेकेएफ फॉरगॉटन क्रायसिस: तिबेट, द सीआयए एँड सिनो-इंडियन वॉर' पुस्तकात याचा उल्लेख आहे.

नेहरूंनी अतिशय काळजीत असताना केनेडींकडे मदत मागितली. यासाठी भारताचे अमेरिकेतील राजदूत यांनी केनेडी यांची भेट घेतली. अत्याधुनिक रडार यंत्रणा असलेल्या लढाऊ विमानांच्या १२ स्कॉड्रन देण्याची मागणी नेहरूंनी केली होती.

पाकिस्तानही करणार होता भारतावर हल्ला?
काश्मीर मिळवण्यासाठी तुम्हीही भारतावर हल्ले करा, असं चीननं पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष अयुब खान यांना सुचवलं होतं. ब्रुस यांच्या पुस्तकात हा तपशील उपलब्ध असल्याचं खालिद अहमद यांनी इंडियन एक्स्प्रेसमध्ये २०१५ साली लिहिलेल्या लेखात आहे. भारतावर हल्ला न करण्याच्या बदल्यात काश्मीर देण्याची मागणी अयुब यांनी अमेरिकेकडे केली होती. अध्यक्ष केनेडींनी भारताला ५०० मिलियन डॉलरची शस्त्रास्त्रांची मदत देऊ केली होती. मात्र केनेडींची हत्या झाल्यानं ही मदत मिळू शकली नाही.

लता मंगेशकर यांचं 'ऐ मेरे वतन के लोगो'
भारत चीनविरुद्घचं युद्ध हरला. त्याच पराभवाच्या आणि भारतीय जवानांच्या बलिदानाच्या पार्श्वभूमीवर लता मंगेशकर यांनी ए मेरे वतन के लोगो हे देशभक्तीपर गीत २७ जून १९६३ रोजी गायलं. त्यांनी नेहरूंच्या उपस्थितीत हे गाणं गायल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं होतं. प्रदीप यांनी रचलेलं हे गीत सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलं. हे गीत ऐकून नेहरूंना अश्रू अनावर झाले होते.

Web Title: India China FaceOff what india lost in 1962 war why china always says india needs to remember lessons from past

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.