India-china : चीनच्या 'बॉर्डर'वर पहिल्यांदाच महिला सैन्य अधिकाऱ्यास मोठी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 06:21 PM2021-10-11T18:21:17+5:302021-10-11T18:34:22+5:30
India-china : आयना राणा यांच्यावर बीआरओच्या 75 नंबर रस्त्याच्या निर्मित्तीची जबाबदारी देण्यात आली असून त्याही मोठ्या शिताफीने हे नेतृत्व सांभाळत आहेत. आयना राणा या मूळ हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यातील रहिवाशी आहेत
नवी दिल्ली - भारत-चीन सीमारेषेवर सैन्य दलासाठी सीमा रस्ते संघटन (बीआरओ) चमोली जिल्ह्यातील नीती व माणा पास यांना रस्त्यांसोबत जोडण्याचं काम पूर्ण करण्यात येत आहे. मात्र, निर्मनुष्य सीमा क्षेत्रात काम असल्या कारणाने आजपर्यंत सैन्य दलातील कुठल्याही महिला अधिकाऱ्यास याजागी बीआरओत नियुक्ती दिली नव्हती. आता, माणा दरीत देशातील सर्वात उंच ठिकाणी होणाऱ्या रस्त्यांमधील एकाची जबाबदारी पहिल्यांदाच मेजर आयना राणा यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
आयना राणा यांच्यावर बीआरओच्या 75 नंबर रस्त्याच्या निर्मित्तीची जबाबदारी देण्यात आली असून त्याही मोठ्या शिताफीने हे नेतृत्व सांभाळत आहेत. आयना राणा या मूळ हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. त्यांचे शिक्षण पंजाबमधील पठाणकोठ येथे झाले. त्यांचे वडिल रेल्वेतील सेवानिवृत्त अधिकारी आहेत, तर आई गृहिणी आहेत. कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतलेल्या आयना लहानपणापासूनच सैन्य दलात भरती होण्याचं स्वप्न पाहत होत्या. त्यामुळेच, आई-वडिलांनीही त्यांचे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना सर्वस्वी पाठबळ दिलं.
आयना यांनी शिक्षण शिकत असतानाच एनसीसीच्या माध्यमातून आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठीचं पहिलं पाऊल टाकलं. एनसीसीत असताना दोनवेळा राष्ट्रीय शिबीरात सहभागी होत आपल्यातील गुणांचं प्रदर्शन केलं. सन 2011 मध्ये त्यांनी अधिकारी प्रशिक्षण अॅकॅडमी (चेन्नई) येथे प्रवेश घेतला. त्यानंतर, सप्टेंबर 2012 मध्ये तेथून पासआऊट होताच सैन्य दलात कोर ऑफ इंजिनिअर विभागात त्या रुजू झाल्या. मिलिट्री ऑफ इंजिनिअरींगमधून सिव्हील इंजिनिअर्संची पदवी पूर्ण केल्यानंतर उत्तराखंड येथे त्यांना नियुक्ती देण्यात आली होती.
चीनच्या सीमारेषेवरील देशातील सर्वात शेटवचं गाव असलेल्या माणा येथपर्यंत पक्का रस्ता बनविण्याचं काम सुरू आहे. हा रस्ता देशातील सर्वात उंच असलेल्या रस्त्यांपैकी एक असणार आहे. हे एक कठीण काम होतं, असे राणा यांनी म्हटलं आहे. मात्र, डीजी यांनी 75 आरसीसी मध्ये त्यांच्यासोबत आणखी काही महिला अधिकाऱ्यांना तैनात करुन कंपनीला वेगळ्या उंचीवरुन नेऊन ठेवल्याचं राणा यांनी म्हटलं आहे. त्यांच्यासमेवत तीन प्लाटून कंमांडर म्हणून अंजना, एई विष्णुमाया व एई भावना यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. याच वर्षी हे काम पूर्ण करण्याचं लक्ष्य असल्याचं आयना यांनी सांगितलंय.