भारत-चीन मैत्री ही जगाची गरज -मिंग शियांगफंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 05:32 AM2018-01-06T05:32:06+5:302018-01-06T05:32:45+5:30
भारत आणि चीन यांच्यातील नाते सुदृढ, स्थिर आणि विश्वासाचे असणे हे फक्त या दोन्ही देशांसाठीच नव्हे, तर दक्षिण आशियाच्या समृद्धतेसाठी आणि मानवी समाजाच्या भल्यासाठीही आवश्यक आहे, असे मत
मुंबई - भारत आणि चीन यांच्यातील नाते सुदृढ, स्थिर आणि विश्वासाचे असणे हे फक्त या दोन्ही देशांसाठीच नव्हे, तर दक्षिण आशियाच्या समृद्धतेसाठी आणि मानवी समाजाच्या भल्यासाठीही आवश्यक आहे, असे मत चीनच्या सत्ताधारी चायनीज कम्युनिस्ट पार्टी (सीपीसी)चे सदस्य मिंग शियांगफंग यांनी व्यक्त केले.
गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात बीजिंग येथे झालेली ‘सीपीसीची नॅशनल कॉन्फरन्स आणि त्याचे भारत-चीन संबंधावरील परिणाम’या विषयावर ते गुरुवारी मुंबईत बोलत होते. आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन, मुंबई आणि चीनचा मुंबईतील दूतावास यांनी संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. या वेळी चीनचे मुंबईतील कौन्सिल जनरल झेन झियुआन, ओआरएफ मुंबईचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांच्यासह दोन्ही देशांतील विविध मान्यवर उपस्थित होते.
भारत-चीन या दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी सर्वांत आधी परस्परांवरील राजकीय विश्वास आणि यूएन, ब्रिक्स, एससीओ अशा जागतिक व्यासपीठावरील सहकार्य याकडे लक्ष द्यायला हवे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंग यांनी या दिशेने पाऊल उचलले असून, त्यात दोघांनाही फायदाच होईल, असा विश्वास मिंग यांनी व्यक्त केला. चीन ही जगाची फॅक्टरी असून आम्ही ‘मेड इन चायना २०२५’ ही योजना सुरू केली आहे. तर भारत हे जगाचे कार्यालय असून ते स्मार्ट सिटी आणि स्कील इंडियासारखे प्रकल्प घेऊन पुढे येत आहे.
या साºया प्रयत्नांमध्ये सहकार्य, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण, कल्पक योजना आणि गुंतवणूक यासाठी अमर्याद संधी उपलब्ध आहेत.
पाश्चिमात्य देश नेतृत्वहीन होत चालले असतानाच, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे मात्र एक द्रष्टे आणि जागतिक दृष्टी असलेले परिपक्व नेतृत्व आहे, अशा शब्दांत ओआरएफ मुंबईचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांनी त्यांचा गौरव केला. चीनच्या बीआरआय प्रकल्पाबाबत भारताने समंजस भूमिका घेण्याची गरज अधोरेखित करताना, या प्रकल्पाद्वारे शेजारील देशांशी विशेषत: पाकिस्तानशी, सार्क देशांशी आणि अगदी चीनशीही संबंध सुधारण्याची संधी यात असल्याचेही कुलकर्णी यांनी नमूद केले.