नाद करा, पण आमचा कुठं! जिनपिंग यांचा हट्ट लडाखच्या थंडीत चिनी सैन्याला महागात पडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 10:44 AM2021-10-12T10:44:05+5:302021-10-12T10:45:37+5:30
-३० डिग्री तापमानात ५० हजार जवान; चीनला संघर्ष भारी पडणार
नवी दिल्ली: चीनच्या आडमुठेपणामुळे पूर्व लडाख सीमेवरील तणाव कायम आहे. चीनच्या कुरापतींचा मुकाबला करण्यासाठी भारत सज्ज आहे. संघर्ष झाल्यास भारताचा पराभव निश्चित, आम्ही कोणताही दबाव घेणार नाही, अशी दर्पोक्ती चीनच्या ग्लोबल टाईम्स या सरकारी वृत्तपत्रानं केली. सध्याच्या घडीला सीमेवर दोन्ही बाजूंनी ५० हजार जवान तैनात आहेत. सीमेवरील तणाव निवळण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. त्यामुळे हिवाळ्यातही दोन्ही बाजूनं सैन्य तैनात असेल. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचा हट्ट चिनी सैनिकांना महागात पडू शकतो. यामागे अनेक कारणं आहेत.
बर्फाळ आणि उंच भागांमध्ये सरावाचा अभाव
हिवाळ्यात पूर्व लडाखमधील तापमान उणे ३० डिग्रीपर्यंत घसरेल. लडाखमधील भीषण थंडी आणि ऑक्सिजनची कमतरता चिनी सैनिकांसाठी जीवघेणी ठरू शकते. चिनी सैनिकांना आताच पोटाच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. याच आजारामुळे चिनी लष्कराच्या सर्वात मोठ्या पश्चिम थिएटर कमांडचे कमांडर राहिलेल्या झांग जुडोंग यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना अवघे ६ महिनेच लडाखमधील आव्हानात्मक स्थितीचा सामना करता आला. चीननं गेल्या ९ महिन्यांत तीनदा पश्चिम थिएटर कमांडचे कमांडर बदलले आहेत. पश्चिम थिएटर कमांडचं मुख्यालय तिबेटमध्ये आहे. या कमांडवर लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंतची जबाबदारी आहे.
भारतीय जवान चीनवर भारी पडणार
भारतीय लष्कराचे जवान उंच भागांमध्ये होणाऱ्या युद्धांत अतिशय निष्णात आणि तरबेज असल्याचं वॉशिंग्टनस्थित अमेरिकन सुरक्षा केंद्राच्या अभ्यासातून समोर आलं आहे. या बाबतीत चिनी सैनिक भारताच्या आसपासदेखील टिकत नाहीत. जगातील सर्वाधिक उंचीवर असलेलं युद्धक्षेत्र अशी ओळख असलेल्या सियाचिनमध्ये भारतीय जवान पाय रोवून उभे आहेत. दुर्गम डोंगराळ भागांत भारतीय जवान युद्धाचा सराव करतात. सियाचिनमधील परिस्थिती लडाखपेक्षा कितीतरी पट अधिक आव्हानात्मक आहे. त्यामुळे संघर्ष झाल्यास भारतीय जवान मोठी आघाडी घेऊ शकतात.
टूटू रेजिमेंटमध्ये भारताकडे आघाडी
लडाखमधील अवघड भौगोलिक स्थितीत संघर्ष झाल्यास भारताच्या टूटू रेजिमेंटची स्थिती उत्तम आहे. या रेजिमेंटची फारशी माहिती कोणाकडेच नाही. या रेजिमेंटचं काम अतिशय गोपनीयरित्या चालतं. यामध्ये आधी तिबेटींचा भरणा होता. आता गोरखा जवानदेखील या रेजिमेंटचा भाग आहेत. या रेजिमेंटची स्थापना १९६२ मध्ये झाली. रेजिमेंटमध्ये स्थानिकांचं प्रमाण खूप आहे. त्यांना तिथल्या परिस्थितीची अतिशय उत्तम जाण आहे.