भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 05:29 PM2024-10-25T17:29:35+5:302024-10-25T17:30:27+5:30
दिवाळीपूर्वी दोन्हे देशांचे सैन्य मागे घेतले जाणार अन् लगेच पेट्रोलिंगला सुरुवात होणार.
India-China Dispute: भारत-चीनचा सीमावाद मिटल्यानंतर आता पूर्व लडाखमधील परिस्थिती सामान्य होऊ लागली आहे. या महिन्याच्या अखेरीस डेमचोक आणि डेपसांगमध्ये पुन्हा गस्त सुरू होणार आहे. तत्पुर्वी, या भागातून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 28-29 ऑक्टोबरपर्यंत दोन्ही देशांचे सैनिक येथून पूर्णपणे माघार घेतील. तसेच, या परिसरात बांधलेले तात्पुरते टेंट/शेड आणि तात्पुरत्या इमारती हटवल्या जातील.
नवा करार फक्त डेपसांग आणि डेमचोकमध्ये लागू असेल
लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवा करार केवळ डेपसांग आणि डेमचोकसाठी लागू असेल, इतर ठिकाणांसाठी नाही. हा करार पँगॉन्ग सरोवराच्या किनाऱ्यासह बफर झोनला लागू होणार नाही. या नवीन करारामुळे दोन्ही बाजूंचे सैन्य (भारत आणि चीन) एप्रिल 2020 पूर्वीच्या स्थितीत परत येईल आणि त्यांनी एप्रिल 2020 पर्यंत ज्या भागात गस्त घातली जात होती, तेथे पुन्हा गस्त सुरू होईल.
या महिन्याच्या अखेरीस पेट्रोलिंग सुरू होईल
यासोबतच ग्राऊंड कमांडरच्या बैठका नियमितपणे घेतल्या जातील. पण, या करारानुसार परिसरात ठराविक संख्येनेच सैनिक गस्त घालू शकतील. गैरसमज टाळण्यासाठी दोन्ही बाजू एकमेकांना गस्त घातल्याची माहिती देतील. दरम्यान, दोन्ही देशांमधील परिस्थिती सामान्य करण्यासाठी सर्व स्तरांवर अनेक चर्चा झाल्या आहेत. 28-29 ऑक्टोबरपर्यंत सैन्य माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि या महिन्याच्या अखेरीस गस्त सुरू होईल.