India China Tension : LACवर 25 दिवसांनंतर पूर्व स्थिती, मागे हटले चिनी सैनिक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 06:37 PM2020-07-09T18:37:11+5:302020-07-09T18:42:58+5:30
एका वरिष्ठ सैन्याधिकाऱ्याचा हवाला देत, एका वृत्तपत्राने दावा केला आहे की, सुमारे 40 हजार भारतीय सैनिक सध्या शस्त्रे आणि दारूगोळा घेऊन एलएसीवर तैनात आहेत. यातील सुमारे 400 सैनिक मागे हटले आहेत.
नवी दिल्ली - पूर्व लडाखमध्ये भारत-चीन सैन्यांत झालेल्या हिंसक झटापटीनंतर बरोबर 25 दिवसांनी, म्हणजे आज, पेट्रोलिंग पॉइंट 17 (हॉट स्प्रिंगचा भाग) वरील चिनी सैनिक मागे हटण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. याच बरोबर आता भारत-चीन यांच्यातील, पेट्रोलिंग पॉइंट -14, पेट्रोलिंग पॉइंट -15 आणि पेट्रोलिंग पॉइंट -17 वरून मागे हटण्याची प्रक्रिया संपली आहे. तसेच लडाखच्या फिंगर्स भागातून चिनी सैन्य मागे सरकत आहे.
चिनी सैनिक गुरुवारी हॉट स्प्रिंग भागातून दोन किलोमीटरपर्यंत मागे सरकले. दोन्ही देशांतील करारानुसार, चिनी सैनिक पेट्रोलिंग पॉइंट14, पेट्रोलिंग पॉइंट-15, पेट्रोलिंग पॉइंट 17 आणि पेट्रोलिंग पॉइंट 17A भागापासून दोन किलोमीटर मागे सरकले आहे. यानंतर भारतीय सैन्यदेखील या जागांवरून दोन किलोमिटरपर्यंत मागे आले आहे.
Disengagement between India and China completed at Patrolling Point 17 (Hot Springs) today. With this, disengagement complete at PP-14, PP-15 and PP-17. Chinese Army thinning out in Finger area in Ladakh: Indian Army Sources pic.twitter.com/60Na3maoEW
— ANI (@ANI) July 9, 2020
कमांडर स्तरावरील बैठक -
पूर्व लडाखमध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चिनी सैनिकांनी एलएसीवर अतिक्रमण केल्यामुळे सुरू झालेला भारत-चीन वाद दोन महिन्यांनंतर संपताना दिसत आहे. यापूर्वी वाद सुरू झाल्यानंतर दोन्ही देशांत सैन्य आणि राजकीय स्तरावर चर्चा झाल्या. 6 जूनच्या कोर कमांडर्सच्या बैठकीत एलएसीवरील अतिक्रमणाच्या वादावर तोडगा काढण्यावर सहमती झाली होती. मात्र, गलवानमध्ये झालेल्या हिंसक झटापटीने सीमेवरील तणाव अधिक वाढला होता.
सीमेवर 40 हजार सैनिक!
एका वरिष्ठ सैन्याधिकाऱ्याचा हवाला देत, एका वृत्तपत्राने दावा केला आहे की, सुमारे 40 हजार भारतीय सैनिक सध्या शस्त्रे आणि दारूगोळा घेऊन एलएसीवर तैनात आहेत. यातील सुमारे 400 सैनिक मागे हटले आहेत. परंतु अशी आशा आहे की, संवादाच्या आणखी काही फेऱ्यानंतर दोन्ही बाजूंकडून सैन्याची ताकद कमी होईल. 6 जून रोजी कोअर कमांडरच्या बैठकीत दोन्ही बाजूंनी सहमती झाली. यानंतर 30 जून रोजी कोअर कमांडरच्या तृतीय स्तराच्या बैठकीत डिसेंजेजमेंटची चर्चा झाली होती.
तत्पूर्वी, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल व चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्यात टेलिफोनवरून झालेल्या दोन तासांच्या चर्चेत दोन्ही देशांनी सीमेवरून असलेले मतभेद वादामध्ये रूपांतरित होऊ न देण्यावर सहमती झाली होती. तसेच सीमेवर शांतता व सलोखा नांदावा यासाठी दोन्ही देशांनी ठरल्याप्रमाणे सैन्यमाघार लवकरात लवकर पूर्ण करावी, असेही ठरले होते.
महत्त्वाच्या बातम्या -
चीनची धमकी - आशियातील अमेरिकेची खेळी घातक, भडकू शकतं युद्ध
चीन PAKला देतोय अत्यंत घातक शस्त्र; जाणून घ्या, कशी आहे भारताची तयारी
भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!
...पण, पंतप्रधान मोदींनी आपल्या दौऱ्यासाठी लेहपासून 25KM दूर असलेले 'न्योमा'च का निवडले?