India-China: मोठी बातमी! पूर्व लडाखमधून भारत-चीनची माघार; 2020च्या हिंसक चकमकीपासून सुरू होता तणाव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 09:10 PM2022-09-13T21:10:08+5:302022-09-13T21:17:53+5:30
India-China: 2020 मध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर दोन्ही देशात तणाव वाढला होता.
India-China: मे 2020 मध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर दोन्ही देशात तणाव वाढला होता. पण,
आता सुमारे 28 महिन्यांपासून सुरू असलेला तणाव कमी होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांच्या सैन्याने पूर्व लडाखमधील हॉट स्प्रिंग आणि गोगरा येथील ठिकाणांवरुन माघार घेतली आहे. लष्कर आणि सॅटेलाईट इमेजमधूनही याची पुष्टी झाली आहे. या भागातील तात्पुरती बांधकामे आणि बंकरही पाडण्यात आले आहेत.
दोन्ही देशांच्या स्थानिक कमांडर्सनी ग्राउंड स्तरावर आढावा घेतल्यानंतर याला दुजोरा दिला आहे. पीपी 15 मधून सैन्य मागे घेण्याबाबत लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, दोन्ही बाजूंनी टप्प्याटप्प्याने आणि समन्वयाने या भागातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षांपूर्वी सीमेवर झालेल्या तणावानंतर दोन्ही देशांचे 50,000 हून अधिक सैनिक या ठिकाणी तैनात आहेत. पण, आता सैनिक मागे हटणार आहेत.
यापूर्वी, भारत आणि चीनच्या सैन्याने पेगॉन्ग लेकच्या उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील वादग्रस्त जागेवरून माघार घेतली होती. मात्र, अनेक ठिकाणी दोन्ही देशांचे सैन्य आजही पूर्वीच्या ठिकाणी गस्त घालण्यासाठी जात नाही. लष्कर आमने-सामने येऊ नये, यासाठी बफर झोन तयार करण्यात आला आहे, जेणेकरून दोन्ही देशांचे सैन्य तणाव टाळू शकतील. लष्कराच्या म्हणण्यानुसार, आता चीनसोबत डेमचोक आणि डेपसांगबाबत चर्चा केली जाईल, हा वाद गलवानच्या आधीपासून आहे.