चीनने पुन्हा हद्द पार केली; सियाचिन ग्लेशियरजवळ बांधला रस्ता, सॅटेलाइट इमेजमधून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 08:16 PM2024-04-25T20:16:58+5:302024-04-25T20:17:51+5:30
China building road In PoK: चीन पाकव्याप्त काश्मीरमध्ये पक्का रस्ता बांधत असल्याची माहिती सॅटेलाइट इमेजमधून समोर आली आहे.
China Building Road In PoK Satellite Image : भारताचा शेजारील देश चीनने पुन्हा एकदा हद्द पार केली आहे. अनेक दशकांपासून भारताच्या सीमेत घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या चीनने आता पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) सियाचीन ग्लेशियरजवळ काँक्रीटचा पक्का रस्ता बनवला आहे. सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून ही बाब उघड झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, हा रस्ता पाकव्याप्त काश्मीरमध्ये सियाचीनच्या उत्तरेला, जगातील सर्वात उंच युद्धभूमीजवळ बांधला जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 1963 मध्ये पाकव्याप्त काश्मीरचा काही भाग चीनकडे गेला होता. आता तिकडेच चीन शाक्सगाम खोऱ्यात G-219 हायवेचा विस्तार करत आहे. हा भाग चीनच्या शिनजियांगला लागून आहे. हे सियाचीन ग्लेशियरच्या इंदिरा कोलच्या उत्तरेस 50 किलोमीटर अंतरावर आहे.
#Exclusive
— Nature Desai (@NatureDesai) April 21, 2024
Thread:
In a significant development, 🇨🇳 road has breached the border at Aghil Pass (4805 m) and entered the lower Shaksgam valley of Kashmir, 🇮🇳 with the road-head now less than 30 miles from 🇮🇳 Siachen
This permanently answers the question of Shaksgam for 🇮🇳
1/4 pic.twitter.com/TyjMcUqz2S
युरोपियन स्पेस एजन्सीने फोटो काढला
रिपोर्ट्सनुसार, युरोपियन स्पेस एजन्सीने आपल्या सॅटेलाईटद्वारे हे फोटो काढले आहेत. हा रस्ता गतवर्षी जून ते ऑगस्ट दरम्यान बांधण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, मार्चपासून आतापर्यंत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दोनदा सियाचीनला भेट दिली आहे.
भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सचे माजी कमांडर लेफ्टनंट जनरल राकेश शर्मा म्हणाले की, चीनने तयार केलेला रस्ता पूर्णपणे बेकायदेशीर आहे. भारताने या प्रकरणाचा विरोध केला पाहिजे. मात्र, या संदर्भात भारत सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. यापूर्वी भारताने पीओकेमधील रस्ते बांधणीवर आक्षेप घेत होता. त्यानंतर पाकिस्तानने हे क्षेत्र चीनला रस्ते बांधण्यासाठी आणि व्यापार करण्यासाठी दिले. चीनने रस्ता बांधल्यानंतर पाकिस्तान आणि चीन सामरिकदृष्ट्या भारतापेक्षा अधिक मजबूत होतील. तज्ज्ञांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.