Ladakh Standoff : लडाखमध्ये अजूनही चीनचे 10 हजार सैनिक तैनात; लष्करी अधिकाऱ्यांची आजही बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 01:11 PM2020-06-11T13:11:25+5:302020-06-11T13:29:35+5:30
Ladakh Standoff: एलएसी सीमेवरून चिनी सैन्य अडीच किलोमीटर मागे हटले आहे. मात्र, चीनचे 10 हजारहून अधिक सैनिक एलएसी सीमेजवळ तैनात आहेत.
नवी दिल्ली : लडाखच्या गलवान भागातून चिनी सैन्य अडीच किलोमीटर मागे सरकले आहे. त्यामुळे भारत आणि चीन यांच्यातील तणाव काहीसा निवळला आहे. बुधवारी (दि.10) दोन्ही देशांच्या मेजर जनरल पातळीवर सुमारे 4 तास चर्चा झाली. तसेच, आज सुद्धा यासंदर्भात चर्चा होणार आहे. आजच्या चर्चेचे ठिकाण अद्याप स्पष्ट झाले नाही. तर काल झालेली चर्चा सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे.
एलएसी सीमेवरून चिनी सैन्य अडीच किलोमीटर मागे हटले आहे. मात्र, चीनचे 10 हजारहून अधिक सैनिक एलएसी सीमेजवळ तैनात आहेत. चिनी सैन्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराचे जवानही सज्ज आहेत. एलएसीवर भारताने दहा ते बारा हजार जवानांची अतिरिक्त तुकडी तैनात केली आहे. चीन आपले सैन्य मागे घेत नाही तोपर्यंत भारतीय जवान सुद्धा माघार घेणार नाहीत.
कर्नल, ब्रिगेडियर आणि मेजर जनरल यांच्यासह चीनशी अनेक स्तरांवर चर्चा सुरु आहे. या चर्चेत एलएसीवरील पेट्रोलिंग पॉईंट 14, पेट्रोलिंग पॉईंट 15 आणि 17 वरील तणाव कमी करण्यासाठी चर्चा होणार आहे. बुधवारी झालेल्या चर्चेत मेजर जनरल दर्जाच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली.
दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये 6 जून रोजी झालेल्या चर्चेनंतर निश्चितच सीमेवरील तणाव कमी झाला आहे. मात्र, अद्याप चीनची वृत्ती बदलली नाही. एलएसीवरून काही प्रमाणात भारताच्या जवानांची माघार घेतली आहे, तर चीनच्या सैन्यानेही काही पावले माघार घेतली आहे. मात्र, फिंगर 4 वरील मार्ग अद्याप सुटला नाही. त्यामुळे पँगोंग लेकजवळी तणाव कायम आहे. भारत सरकार असा दावा करीत आहे की, पँगोंगच्या काठावरील फिंगर 1 ते फिंगर 8 पर्यंतचा सर्व भाग भारताचा आहे.
चिनी सैन्याची माघार, पण जिनपिंग यांचा स्टार कमांडर सीमेवर तैनात
सीमेवरून चीनच्या सैन्याने माघार घेतली आहे. मात्र, चीनने राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी भारत-चीन सीमेवर चिनी सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी नवीन कमांडर लेफ्टनंट जनरल शु किलिंग यांना पाठवले आहे. भारत-चीन सीमेसाठी ते वेस्टर्न थिएटर कमांडची जबाबदारी पार पाडणार आहेत. भारत-चीन सीमेवर तणाव वाढला होता. त्याचवेळी म्हणजेच 5 जून रोजी जनरल शु किलिंग यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली होती. हाँगकाँगस्थित साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, जनरल शु किलिंग यांना वेस्टर्न थिएटर कमांडच्या सैन्याचा आढावा घेण्यासाठी पाठविण्यात आले आहे. ज्याठिकाणी भारत-चीन यांच्यात सीमेवरून वाद-विवाद कायम आहे.
आणखी बातम्या...
"काहीही झाले तरी चीनच्या धमक्यांना घाबरणार नाही"
CoronaVirus News : कोरोनाची धास्ती वाढली, गेल्या 24 तासांत 9,996 नवे रुग्ण, 357 जणांचा मृत्यू