अक्साई चीन आता परत घेण्याची वेळ आली आहे - जामयांग नामग्याल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 03:36 PM2020-06-19T15:36:23+5:302020-06-19T15:42:30+5:30
जामयांग नामग्याल यांनी गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे सांगितले.
नवी दिल्ली : पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत- चीन सैनिकांदरम्यान झालेल्या हिंसक संघर्षानंतर सीमेवर तणाव वाढला असून चीनविरोधात संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. यातच आता भाजपाचे लडाखचे खासदार जामयांग नामग्याल यांनी 'अक्साई चीन'बाबत सूचक विधान केले आहे.
आता चीनकडून अक्साई चीनचा भाग परत मिळविण्याची वेळ आली आहे, असे जामयांग नामग्याल यांनी सांगितले. तसेच, हा 2020 मधील भारत आहे, 1962 सालचा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलतात ते करून दाखवितात, असेही जामयांग नामग्याल यांनी म्हटले आहे.
भारत आणि चीन यांच्यातील सीमावादाचे समाधान फक्त लडाखच्या नागरिकांना नाही तर संपूर्ण भारताला हवे आहे. जवानांना गमावणं आणि सीमेजवळ राहणाऱ्या नागरिकांच्या सामान्य जीवनावर परिणाम आम्हाला नको आहे. या समस्येवर कायमचा उपाय सर्वांना हवा आहे. चीनने भारताच्या पाठीत एकदा नाही तर वारंवार खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला आहे, असे जामयांग नामग्याल म्हणाले.
अक्साई चीन हा भारताचा भूभाग आहे. ज्याला चीनने ताब्यात घेतले आहे. हा भाग परत मिळविण्याची आता वेळ आली आहे. हे कठीण आहे, मात्र अशक्य सुद्धा नाही, असेही जामयांग नामग्याल यांनी म्हटले आहे. यावेळी जामयांग नामग्याल यांनी गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे सांगितले.
दरम्यान, भारत आणि चीन यांच्यात गेल्या सोमवारी झालेल्या हिंसक धुमश्चक्रीमध्ये चीनचे 43 हून सैनिक मारले गेले आहेत. तर भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. चीनच्या सैनिकांनी भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो त्यांच्याच अंगलट आला आहे. या घटनेनंतर सीमेवरील तणाव वाढला असून चीनविरोधात संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे आता लडाख सीमेजवळच नाही तर संपूर्ण सीमेवर जवान सतर्क आहेत.
आणखी बातम्या...
आकाशात दिसला रहस्यमय असा पांढरा फुगा; लोक म्हणाले, 'एलियन शिप'
Encounters In Jammu & Kashmir: सुरक्षा दलांना मोठं यश, जम्मू-काश्मीरमध्ये 8 दहशतवाद्यांना कंठस्नान
देमचोक, पेंगाँग भागातील गावे खाली करण्याचे लष्काराचे आदेश, सूत्रांची माहिती
कॉल आला अन् सांगितले, "तुम्ही अमनचे वडील आहात? तुमचा मुलगा देशासाठी शहीद झाला"