'हा 1962चा भारत नाही, चीनला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल'- फारुख अब्दुल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 02:55 PM2022-12-23T14:55:22+5:302022-12-23T19:27:29+5:30
India China Tension: अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव कायम आहे.
Farooq Abdullah On China: अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव कायम आहे. यादरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे (NC) अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले फारुख अब्दुल्ला यांनी चीनला प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, 'हा 1962 चा भारत नाही, आम्ही बांगड्या घातल्या नाहीत. चीनला त्याच्याच भाषेत उत्तर दिले जाईल.'
9 डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये चिनी आणि भारतीय लष्करामध्ये हिंसक चकमक झाली होती. ज्यामध्ये दोन्ही देशांच्या सैन्याला किरकोळ दुखापत झाल्याची चर्चा होती. चकमकीनंतर भारत आणि चीनच्या कमांडर्सची फ्लॅग मीटिंग झाली आणि त्यानंतर दोन्ही देशांचे सैनिक मागे हटले. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला हे नेहमीच भारताच्या चीन आणि पाकिस्तानसोबत चर्चेचे समर्थन करतात. यावेळी त्यांनी चीनला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचे समर्थन केले.
यापूर्वी चीनशी चर्चेचे समर्थन केले
माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी तवांगमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीवर चीनशी चर्चा केली पाहिजे असे म्हटले होते. त्याचबरोबर शेजारील पाकिस्तानशी संबंध सुधारण्याची वकिली केली. शेजाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण होईपर्यंत भारतात शांतता कधीच पाहायला मिळणार नाही, असे ते म्हणाले होते. पण, यावेळी फारुख अब्दुल्ला यांचा चीनबाबतचा सूर बदलला आहे. चीनच्या कारवाईवर निशाणा साधत त्यांनी चीनला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यास सांगितले आहे.
भारत-चीन LAC वाद
LAC वर भारत आणि चीनमध्ये एकूण 23 ठिकाणी वाद आहे, त्यापैकी 13 प्रमुख ठिकाण आहेत. लडाख क्षेत्रातील 7 विवादित क्षेत्रांपैकी 5 भागात चीन सामरिकदृष्ट्या कमकुवत आहे. याशिवाय 6 वादग्रस्त क्षेत्रे पूर्वेकडील सेक्टरमध्ये आहेत. 1962 मध्ये भारत-चीन युद्धानंतर चिनी सैन्य उंच ठिकाणी परतले होते. गेल्या वर्षी लडाखमधील 5 वादग्रस्त भागात बफर झोन तयार करण्यात आला होता. त्यामुळे बफर झोनमध्ये गस्त नसल्याने एलएसीची स्थिती एलओसीसारखी झाली आहे.