भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 06:36 AM2024-11-17T06:36:45+5:302024-11-17T06:38:39+5:30
सैन्य माघारी घेण्याविषयीच्या अंतिम पावलानंतर भारत व चीनच्या संबंधांमध्ये आणखी सुधारणा नक्की होईल, असे जयशंकर म्हणाले.
नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये चीनसोबतच्या प्रत्यक्ष ताबा रेषेवर तैनात असलेल्या सैन्याला युद्धसदृश आक्रमक पवित्र्यातून बाहेर काढण्याची `समस्या` सुटलेली असल्याने आता तणाव कमी करण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी सांगितले.
ते म्हणाले, सैन्य माघारी घेण्याविषयीच्या अंतिम पावलानंतर भारत व चीनच्या संबंधांमध्ये आणखी सुधारणा नक्की होईल. सैन्य मागे नेणे या प्रक्रियेकडे मी त्याच दृष्टीने बघतो. त्यापेक्षा वेगळा अर्थ काढण्याचा मी प्रयत्न केलेला नाही.
पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवरून सैन्य मागे नेण्याबाबत भारत व चीनमध्ये २१ ऑक्टोबर रोजी करार झाला होता. त्याबाबत एस. जयशंकर यांनी सांगितले की, या कराराच्या अंमलबजावणीकडे आता लक्ष देण्यात येत आहे. गेल्या महिन्यात दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली. ही घटना भारत व चीनमधील संबंध पुन्हा सुरळीत होण्याची सुरुवात आहे का, या प्रश्नावर जयशंकर यांनी हे उत्तर दिले.
‘सलग तीन वेळा सत्तेवर येणे सर्वसामान्य नाही’
-एस. जयशंकर म्हणाले की, जगात अनेक देशांमध्ये राजकीय अस्थैर्य आहे. मात्र, भारतातील राजकीय स्थैर्याकडे जग आशेने पाहत आहे.
-एखाद्या देशातील सरकार सलग तीनवेळा सत्तेवर येणे ही सर्वसामान्य गोष्ट नाही. हे भारतात घडले आहे.
-अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प ज्या गोष्टींचा प्रचार करून पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले होते, त्या समस्या त्यांच्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळातही कायम आहेत.
-किंबहुना या समस्यांनी अधिक गंभीर स्वरूप धारण केले आहे. रशिया व युक्रेनमधील मतभेदांवर युद्धामुळे नव्हेतर, चर्चेच्या माध्यमातूनच तोडगा निघेल, अशी भारताची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.