भारत-चीन सैन्य मागे घेण्यास तयार, पूर्व लडाखमध्ये डेमचोक आणि डेपसांगवर तोडगा अंतिम टप्प्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 05:35 AM2024-10-30T05:35:56+5:302024-10-30T05:36:40+5:30
भारतीय सैन्याने या भागातून आपली उपकरणे मागे घेण्यास सुरुवात केली होती.
नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यातील महत्त्वपूर्ण करारानंतर पूर्व लडाखमधील डेमचोक आणि डेपसांग या संघर्षाच्या दोन केंद्रस्थानांवरून सैन्य मागे घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. अधिकृत सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव निवळण्यास मदत होणार आहे.
लष्कराच्या सूत्रांनी २५ ऑक्टोबर रोजी सांगितले होते की, २८ ते २९ ऑक्टोबरपर्यंत सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. कराराच्या रूपरेषेवर प्रथम राजनैतिक पातळीवर स्वाक्षरी करण्यात आली आणि त्यानंतर लष्करी पातळीवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले होते. भारतीय सैन्याने या भागातून आपली उपकरणे मागे घेण्यास सुरुवात केली होती.
या प्रक्रियेबाबत एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले की, संघर्षाच्या दोन केंद्रस्थानांवरून माघारी आता अंतिम टप्प्यात आहे. लष्करातील सूत्रांनी गेल्या आठवड्यात सांगितले की, संघर्षाच्या दोन केंद्रस्थानांबाबत करार झाला आहे आणि इतर क्षेत्रांसाठी चर्चा अद्याप सुरू आहे. गेल्या आठवड्यात सुरू झालेली लष्करी माघार पूर्ण झाल्यानंतर या भागात गस्त सुरू होईल. त्यानंतर दोन्ही बाजू आपले सैन्य मागे घेतील आणि तात्पुरते बांधकाम आदी नष्ट करतील. या भागात गस्त घालण्याची परिस्थिती एप्रिल २०२० पूर्वीच्या पातळीवर आणली जाण्याची अपेक्षा आहे.
लष्कराने सज्ज रहावे : जयशंकर
वेगाने उदयास येत असलेले भू-राजकीय धोके आणि संधींशी जुळवून घेण्यास तयार राहण्याचे आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी लष्करी नेतृत्वाला केले. सैन्य कमांडर संमेलन-२०२४ च्या दुसऱ्या टप्प्याच्या समारोपाच्या दिवशी ते बोलत होते. “जागतिक आणि भू-राजकीय गुंतागुंत : भारतासाठी संधी आणि सशस्त्र दलांकडून अपेक्षा” हा त्यांच्या भाषणाचा विषय होता. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची यावेळी उपस्थिती होती.