भारत, चीन युद्धसराव सुरू
By admin | Published: October 12, 2015 10:44 PM2015-10-12T22:44:30+5:302015-10-12T22:44:30+5:30
भारतीय व चिनी लष्कराच्या दहशतवाद प्रतिबंधक संयुक्त युद्ध सरावास चीनच्या युनान प्रांतात प्रारंभ झाला. हा दहादिवसीय सराव परस्पर ताळमेळ, संपर्क आणि सहकार्य वृद्धिंगत करण्यास उपयोगी ठरेल
बीजिंग : भारतीय व चिनी लष्कराच्या दहशतवाद प्रतिबंधक संयुक्त युद्ध सरावास चीनच्या युनान प्रांतात प्रारंभ झाला. हा दहादिवसीय सराव परस्पर ताळमेळ, संपर्क आणि सहकार्य वृद्धिंगत करण्यास उपयोगी ठरेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
भारताने या युद्ध सरावात भाग घेण्यासाठी प्रथमच ईस्टर्न कमांडच्या नागा रेजिमेंटच्या १७५ जवानांचे एक पथक पाठविले आहे. हे पथकच चीनलगतच्या सीमेची निगराणी करते.
चीनच्या चेंगदू लष्करी विभागाच्या १४ कोरचे जवान या सरावात भाग घेत असून त्यांच्याकडेही भारतालगतच्या सीमावर्ती भागांवर निगराणी ठेवण्याची जबाबदारी आहे.
भारतीय दूतावासाने सोमवारी येथे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, दोन्ही देशांनी संयुक्त युद्ध सरावासाठी समप्रमाणात सैनिक पाठवले असून हा सराव २२ आॅक्टोबरपर्यंत चालणार आहे. दोन्ही देशांचे जवान कसून युद्ध सराव करतील. चेंगदू लष्करी विभागाचे उपकमांडर लेफ्टनंट जनरल झोऊ शियाओझोऊ यांनी उद्घाटन सोहळ्यात दहशतवादाविरुद्ध युद्ध सराव करीत असलेल्या जवानांना संबोधित केले. ते म्हणाले की, भारत आणि चीनदरम्यानचे उच्चस्तरीय दौरे व विशेष करून चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी गेल्या वर्षी केलेला भारताचा दौरा व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच केलेल्या चीनच्या दौऱ्याने द्विपत्रीय संबंधांना चालना मिळाली आहे.