लडाखजवळ चिनी लढाऊ विमानाची घुसखोरी, ड्रॅगनची पुन्हा कुरापत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 09:09 AM2022-07-09T09:09:39+5:302022-07-09T09:11:21+5:30
चीनच्या वायुसेनेच्या लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ कुरापती सुरूच आहेत.
चीनच्या वायुसेनेच्या लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ कुरापती सुरूच आहेत. चिनी वायुसेनेचा लडाखजवळ सराव सुरू आहे. त्यावेळी एक विमान पूर्व लडाखमध्ये भारतीय वायुसेनेच्या रडारवर आले हाेते. त्या ठिकाणापासून अतिशय जवळच भारतीय जवान तैनात आहेत. त्यानंतर भारतीय वायुसेनेने तातडीने कारवाई करण्याची तयारी केली हाेती. कारवाईचा इशारा दिल्यानंतर चिनी विमान परतले. मात्र, भारताने या घटनेबाबत चीनकडे तीव्र आक्षेप नाेंदविला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात हा प्रकार घडला हाेता. चिनी वायुसेनेकडून सरावादरम्यान हवाई सुरक्षेसंबंधी शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात येत आहे. त्यादरम्यान, एक विमान भारतीय सीमेच्या अतिशय जवळ आले हाेते. ते रडारवर येताच भारतीय वायुसेना अलर्ट झाली. सीमेजवळ माेठ्या प्रमाणात भारतीय सैनिक तैनात आहेत. त्यांच्या पाेझिशन्सपासून चिनी विमान खूप जवळ पाेहाेचले हाेते. हा प्रकार घुसखाेरीचा असल्याचे ठरवून वायुसेनेने कारवाईची तयारी केली हाेती. गलवानच्या खाेऱ्यात २०२०मध्ये झालेल्या संघर्षानंतर लडाखच्या सीमेवर दाेन्ही देशांचे ५० हजारांहून अधिक सैनिक तैनात आहेत.
ड्रॅगनला सज्जड दम
भारताने चिनी अधिकाऱ्यांसमाेर हा मुद्दा उपस्थित करून असे प्रकार हाेऊ नयेत, याबाबत सज्जड दम दिला आहे. त्यानंतर ड्रॅगनने एक पाऊल मागे घेतले असून, सीमेजवळ पुन्हा असा प्रकार घडलेला नाही.