संरक्षण उत्पादनाची क्षमता वाढविण्यास भारत बांधिल- नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 12:00 AM2021-02-23T00:00:16+5:302021-02-23T00:00:34+5:30
केंद्रीय अर्थसंकल्पाची प्रभावी अंमलबजावणी या विषयावरील एका वेबिनारला संबोधित करताना मोदी यांनी हे वक्तव्य केले.
नवी दिल्ली : शस्त्रास्त्रे आणि लष्करी उपकरणे बनविण्याची दीर्घ परंपरा भारताला आहे. तथापि, स्वातंत्र्यानंतर त्यासंबंधीची क्षमता वाढविलीच गेली नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आता संरक्षण उपकरण उत्पादन क्षमता गतीने वाढविण्यास आपले सरकार बांधिल आहे, असेही त्यांनी म्हटले.
केंद्रीय अर्थसंकल्पाची प्रभावी अंमलबजावणी या विषयावरील एका वेबिनारला संबोधित करताना मोदी यांनी हे वक्तव्य केले. संरक्षण क्षेत्रात देशाला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी सरकारने अनेक उपाय योजना केल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. मोदी म्हणाले की, स्वातंत्र्यापूर्वी आपल्या देशात शेकडो शस्त्रास्त्र कारखाने होते. दोन्ही महायुद्धांत भारतातून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची निर्यात करण्यात आली होती. स्वातंत्र्यानंतर मात्र अनेक कारणांमुळे ही व्यवस्था मजबूत केली गेलीच नाही.