इस्रोनं रचला इतिहास, स्वदेशी बनावटीच्या IRNSS-1आय उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 07:06 AM2018-04-12T07:06:50+5:302018-04-12T07:29:09+5:30
भारतीय अवकाश संशोधन संस्थे(इस्रो)नं आणखी एक नवा इतिहास स्वतःच्या नावे केला आहे. इस्रोनं आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा येथून IRNSS-1आय उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे.
नवी दिल्ली- भारतीय अवकाश संशोधन संस्थे(इस्रो)नं आणखी एक नवा इतिहास स्वतःच्या नावे केला आहे. इस्रोनं आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून पहाटे 4 वाजून 4 मिनिटांनी IRNSS-1आय उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं. पीएसएलव्ही-सी 41 रॉकेटमधून IRNSS-1आय उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं. विशेष म्हणजे IRNSS-1आय हा उपग्रह स्वदेशी बनावटीचा आहे. IRNSS-1I या सॅटेलाइटचं वजन 1425 किलोग्राम आहे. तसेच त्या उपग्रहाची लांबी 1.58 मीटर, उंची 1.5 मीटर आणि रुंदी 1.5 मीटर असून, हा उपग्रह बनवण्यासाठी 1420 कोटी रुपयांइतका खर्च आला आहे. या उपग्रहामुळे देशातील जीपीएस प्रणाली सक्षम होण्यासाठी मदत होणार असून, समुद्रातील दिशा समजण्यासाठीही हा ग्रह फायदेशीर ठरणार आहे. तसेच या सॅटेलाइटचा नौदलाला मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे.
WATCH: ISRO launches the IRNSS-1I navigation satellite aboard the PSLV-C41 from First Launch Pad (FLP) of SDSC SHAR, Sriharikota. #AndhraPradeshpic.twitter.com/RNfzYfw0VJ
— ANI (@ANI) April 11, 2018
गेल्या काही दिवसांपूर्वी स्वदेशी बनावटीच्या GSAT-6A या उपग्रहाचं इस्रोनं यशस्वीरीत्या प्रक्षेपण केल्यानंतर आता त्या उपग्रहाशी संपर्क तुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. GSAT-6A या उपग्रहाचा भारतीय अवकाश संशोधन संस्थेशी संपर्क खंडित झाला. यामुळे शास्त्रज्ञांबरोबरच लष्करालाही मोठा झटका बसला. श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रावरून GSAT-6A या उपग्रहानं गुरुवारी 4.56च्या सुमारास GSLV रॉकेटमधून अवकाशात प्रक्षेपण करण्यात आलं होतं. परंतु 48 तासांपेक्षा कमी वेळात या मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. GSAT-6A या उपग्रहाशी आमचा तिस-या दिवशी संपर्क तुटला आहे. तसेच या GSAT-6A या उपग्रहाशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असंही इस्रोकडून सांगण्यात आलं होतं. पॉवर सिस्टीम फेल झाल्यामुळे संपर्क तुटल्याचं आता बोललं जातंय. तिस-या कक्षेत गेल्यानंतर उपग्रहाशी संपर्क तुटला आहे.