भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 08:09 AM2024-11-26T08:09:27+5:302024-11-26T08:09:59+5:30
अमेरिकेत ५ नोव्हेंबरला झालेल्या निवडणुकीची मतमोजणी अद्याप सुरूच, अमेरिकेत बहुतेक मतदान कागदी मतपत्रिका किंवा ई-मेल मतपत्रिकेद्वारे केले जाते. २०२४च्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदानासाठी मशीन्सचा वापर फक्त ५% क्षेत्रात करण्यात आला.
न्यूयॉर्क - टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांनी भारताच्या निवडणूक पद्धतीचे कौतुक केले आहे. भारताने महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीसह अनेक राज्यांतील पोटनिवडणुका आणि लोकसभेच्या काही जागांचा निकाल जाहीर केला आहे. त्यावरून मस्क यांनी भारताच्या निवडणूक आयोगाचे कौतुक केले आहे.
भारतात एकाच दिवसात ६४ कोटी मतांची मोजणी (लोकसभा निवडणूक) करण्यात आली तर कॅलिफोर्नियामध्ये निवडणुकीच्या १८ दिवसांनंतरही मते मोजली जात आहेत. यावर त्यांनी एका दिवसात भारताची ६४ कोटी मते कशी मोजली गेली, असा प्रश्नही मस्क यांनी उपस्थित केला आहे.
इलॉन मस्क यांचा ईव्हीएमवर आक्षेप
डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक इलॉन मस्क यांनी भारताच्या मतदान व्यवस्थेचे कौतुक करणे यामुळे महत्त्वाचे आहे की ते सातत्याने ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत आहेत. काही दिवसांपूर्वी मतदानात बॅलेट पेपरच्या वापरावर भर देताना त्यांनी संगणक प्रोग्रामवर अधिक विश्वास ठेवता येत नसल्याचा दावा केला होता. ते स्वत: संगणकतज्ज्ञ असल्याने ईव्हीएम हॅक करणे सोपे आहे हे त्यांना माहीत आहे. मतपत्रिका वापराव्यात आणि त्यांची हाताने मोजणी करावी, असे त्यांचे मत आहे.
येथे का लागतोय वेळ?
अमेरिकेत बहुतेक मतदान कागदी मतपत्रिका किंवा ई-मेल मतपत्रिकेद्वारे केले जाते. २०२४च्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदानासाठी मशीन्सचा वापर फक्त ५% क्षेत्रात करण्यात आला. त्यामुळे मोजणीला बराच वेळ लागतो आहे. कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील सर्वांत मोठे राज्य आहे. येथे ३.९ कोटी लोक राहतात. ५ नोव्हेंबर रोजी झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत १.६ कोटी लोकांनी मतदान केले होते. मतदानाला दोन आठवडे उलटले तरी अद्याप सुमारे तीन लाख मतांची मोजणी व्हायची आहे. अमेरिकेत दरवर्षी मतमोजणी व्हायला आठवडा लागतो.