दहशतवादाविरुद्ध निर्णायक कारवाईचे भारत-सायप्रसचे आवाहन

By admin | Published: April 29, 2017 12:47 AM2017-04-29T00:47:41+5:302017-04-29T00:47:41+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस अ‍ॅनास्टासियाडेस यांनी शुक्रवारी द्विपक्षीय, तसेच प्रादेशिक मुद्यांवर सविस्तर चर्चा केली.

India-Cyprus appeal for decisive action against terrorism | दहशतवादाविरुद्ध निर्णायक कारवाईचे भारत-सायप्रसचे आवाहन

दहशतवादाविरुद्ध निर्णायक कारवाईचे भारत-सायप्रसचे आवाहन

Next

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस अ‍ॅनास्टासियाडेस यांनी शुक्रवारी द्विपक्षीय, तसेच प्रादेशिक मुद्यांवर सविस्तर चर्चा केली. हिंसाचाराच्या कारखान्यांना अभय देणाऱ्या देशांविरुद्ध सर्व देशांनी निर्णायक कृती करण्याच्या आवश्यकतेबाबत उभय नेते सहमत झाले.
मोदी-निकोस बैठकीनंतर उभय देशांनी हवाई सेवा आणि व्यापारी जहाज वाहतुकीसह चार करारांवर स्वाक्षरी केली. सायप्रस अध्यक्षांसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना मोदी म्हणाले की, महत्त्वाच्या मुद्यांवर भारत नेहमीच सायप्रसच्या बाजूने उभा राहील. सायप्रसचे सार्वभौमत्व, एकात्मता आणि प्रादेशिक अखंडत्वाला भारताचा कायम पाठिंबा आहे. आम्ही परस्पर हिताच्या द्विपक्षीय, प्रादेशिक तद्वतच आंतरराष्ट्रीय मुद्यावर सविस्तर चर्चा केली, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, आमच्या भागात हिंसाचाराचे कारखाने सुरू करणाऱ्यांविरुद्ध सर्व देशांनी मिळून निर्णायक कारवाई करण्याची गरज असल्याबाबत आमचे एकमत झाले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत लवकर सुधारणा घडवून आणण्याबाबतही उभय देशांचे एकमत झाले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताचा कायम सदस्य म्हणून समावेश करण्यास पाठिंबा दिल्याबद्दल मोदींनी सायप्रसचे कौतुक केले.
तत्पूर्वी परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी सायप्रसच्या अध्यक्षांची भेट घेऊन द्विपक्षीय सहकार्याच्या क्षेत्रांविषयी त्यांच्याशी चर्चा केली होती.

Web Title: India-Cyprus appeal for decisive action against terrorism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.