राजकोटमध्ये भारत - द. आफ्रिका संघाच्या खेळाडूंचा मार्ग रोखू - हार्दिक पटेल
By admin | Published: October 17, 2015 11:20 AM2015-10-17T11:20:52+5:302015-10-17T11:21:20+5:30
गुजरातमधील पाटीदार पटेल आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलने उद्या राजकोटमध्ये होणा-या क्रिकेट सामन्याच्यावेळी भारत व दक्षिण आफ्रिकेच्या संघातील खेळाडूंचा रस्ता अडवण्याची धमकी दिली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. १७ - गुजरातमधील पाटीदार पटेल आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलने उद्या राजकोटमध्ये होणा-या क्रिकेट सामन्याच्यावेळी भारत व दक्षिण आफ्रिकेच्या संघातील खेळाडूंचा रस्ता अडवण्याची धमकी दिली आहे. उद्या ( १८ ऑक्टोबर) होणा-या वन-डे सामन्यात जाण्यापासून आम्हाला रोखण्यात आले तर आम्हीही दोन्ही संघांना मैदानात जाऊ देणार नाही, असे हार्दिकने म्हटले आहे.
सामन्यादरम्यान आमच्या समाजाच्या प्रेक्षकांनी घोषणा करू नयेत म्हणून त्यांना तिकिटे देण्यापासून वंचित ठेवले जात आहे. अनेक तिकिटे शिल्लक असूनही सौराष्ट्र क्रिकेट संघटनेने सामन्याची तिकिटे संपल्याचे जाहीर केले आहे, असा आरोप हार्दिकने केला आहे. जर आम्हाला तिकिटे देण्यात आली नाहीत तर खेळाडूंचे ज्या हॉटेलमध्ये वास्तव्य आहे तिथपासून ते स्टेडियमपर्यंतच्या मार्गावर आंदोलन करत त्यांना स्टेडियमवर जाण्यापासून रोखण्यात येईल असे हार्दिकने जाहीर केले.
हार्दिक पटेलने दिलेल्या या धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून स्टेडियममध्ये प्रवेश करणा-या प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी करण्यात येणार आहे. तसेच स्टेडियमच्या गॅलरीत मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात येणार आहेत व अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात येणार आहेत.