भारताने गुलामगिरी मानसिकतेतून स्वातंत्र्य घोषित केले : नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 07:00 AM2023-12-19T07:00:28+5:302023-12-19T07:00:45+5:30
वाराणसीत जगातील सर्वांत मोठे ध्यानकेंद्र स्वर्वेद महामंदिराचे उद्घाटन
वाराणसी : देशाने गुलामगिरीच्या मानसिकतेतून स्वातंत्र्य घोषित केले आहे आणि आपल्या वारशाचा आम्हाला अभिमान आहे, असे प्रतिपादन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. जगातील सर्वांत मोठ्या ध्यान केंद्र स्वर्वेद महामंदिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
मोदी म्हणाले, गुलामगिरीच्या काळात भारताला कमकुवत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अत्याचारींनी सर्वप्रथम आमच्या प्रतीकांना लक्ष्य केले. स्वातंत्र्यानंतर या सांस्कृतिक प्रतीकांची पुनर्बांधणी आवश्यक होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला विरोध झाला आणि ही विचारप्रक्रिया अनेक दशके प्रबळ राहिली. परिणामी देश निकृष्टतेच्या दरीत लोटला गेला व परंपरेचा अभिमान बाळगायला विसरला.
देशाने लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य घोषित केले आहे आणि आपल्या वारशाचा आम्हाला अभिमान आहे. सोमनाथपासून सुरू झालेले कार्य आता मोहीम बनले आहे. आज विश्वनाथाची भव्यता भारताच्या अविनाशी वैभवाच्या गाथा गात आहे, केदारनाथ विकासाच्या नव्या उंचीला स्पर्श करीत आहे आणि महाकाल महालोक अमरत्वाचा दाखला देत आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
२०,००० साधक करू शकतात साधना
स्वर्वेद महामंदिराच्या उद्घाटनानंतर, मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमवेत एका वेळी २०,००० लोक ध्यानासाठी बसू शकतील अशा केंद्राचा दौरा केला. महामंदिराच्या भिंतीवर स्वर्वेदाचे श्लोक कोरलेले आहेत तर एकूण सात मजली रचना आहे.
दुसरी भगवी वंदे भारत एक्स्प्रेस
वाराणसी आणि नवी दिल्लीदरम्यान दुसऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी हिरवा झेंडा दाखवला. रेल्वे मंत्रालयाने देशात सुरू केलेली ही दुसरी भगव्या रंगाची वंदे भारत रेल्वे आहे. पहिली भगवी-राखाडी रंगाची वंदे भारत रेल्वे कासारगोड आणि तिरुवनंतपुरमदरम्यान २४ सप्टेंबर रोजी सुरू झाली.
बुद्धिस्ट सर्किट विकसित करून भारताने जगाला भगवान बुद्धांच्या ध्यानस्थळांना भेट देण्याचे निमंत्रण दिले आहे. राम सर्किटचा विकास वेगाने सुरू आहे. येत्या काही आठवड्यांत अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल, असेही ते म्हणाले.