Omicron Variant: ओमायक्रॉनचा धोका! आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु होणार नाहीत; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 04:23 PM2021-12-01T16:23:40+5:302021-12-01T16:23:57+5:30
कोविड १९ महामारीमुळे २३ मार्च २०२० पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणावर निर्बंध आणले आहेत. मागील वर्षी जुलै महिन्यात २८ देशांशी झालेल्या एअर बबल करारानुसार विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी देण्यात आली होती.
नवी दिल्ली – कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे सध्या जगातील अनेक देशांची चिंता वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेत सापडलेला ओमायक्रॉन व्हेरिएंट सध्या १३ हून अधिक देशांत पसरला आहे. डेल्टा व्हेरिएंटपेक्षा हा व्हेरिएंट घातक आणि अधिक वेगाने पसरत असल्याने WHO ने सर्व देशांना सतर्क केले आहे. त्यामुळेच बहुतांश देशांनी आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवेवर निर्बंध आणले आहेत.
भारत सरकारनेही येत्या १५ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवेचा निर्णय स्थगित केला आहे. २६ नोव्हेंबरला नागरी उड्डाण मंत्रालयाने १५ डिसेंबरपासून भारतात येणाऱ्या आणि जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवेवरील बंदी हटवली होती. परंतु कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे सरकारने हा निर्णय तुर्तास स्थगित केला आहे. नवीन तारखेची घोषणा पुढील परिस्थितीचा आढावा घेऊन केली जाईल असं सांगण्यात आले आहे.
कोविड १९ महामारीमुळे २३ मार्च २०२० पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणावर निर्बंध आणले आहेत. मागील वर्षी जुलै महिन्यात २८ देशांशी झालेल्या एअर बबल करारानुसार विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी देण्यात आली होती. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने जगातील अनेक देशात पुन्हा दहशत माजली आहे. WHO ने या व्हेरिएंटला Variant of Concern घोषित केले आहे. सर्व देशांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे भारताने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.
Directorate General of Civil Aviation says it will notify its decision in due course on date of resumption of scheduled commercial international passengers airline services to/from India. It also says that situation being watched closely in view of emergence of new COVID variant. pic.twitter.com/5poCWXL8jP
— ANI (@ANI) December 1, 2021
१४ देश वगळणार होते
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरच्या तिसर्या आठवड्यापासून भारत प्रतिबंधित १४ देश वगळता नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करणार होते. परंतु आता हा निर्णय स्थगित केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या १४ देशांसाठी फ्लाइट्सवर बंदी कायम राहणार होती. त्यात ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, फिनलंड, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, चीन, मॉरिशस, सिंगापूर, बांगलादेश, बोत्सवाना, झिम्बाब्वे आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे.
किती धोकादायक आहे व्हेरिएंट?
कोरोनाचा नवा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेत समोर आला होता. आता ओमायक्रॉन व्हेरिएंट जगातील २२ देशांमध्ये पसरला आहे. कोरोनाचा हा व्हेरिएंट अधिक घातक आणि संक्रमक असल्याचं दक्षिण आफ्रिकेचे आरोग्य मंत्री म्हणाले आहेत. हा आतापर्यंतच्या डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत खूप वेगळा आहे. त्यात ३० हून अधिक म्युटेशन पाहायला मिळाले आहेत. तसेच अन्य व्हेरिएंटपेक्षा ओमायक्रॉन हा अधिक वेगाने संक्रमित करत आहे.