सीमेवर ब्रह्मोस मिसाइल तैनात करणार भारत, चीनला झोंबली मिरची; म्हणे, सीमा वादात अडचण निर्माण होईल!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 01:20 PM2021-11-15T13:20:48+5:302021-11-15T13:21:32+5:30
सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतानं आता सीमेवर सर्वात खतरनाक ब्रह्मोस मिसाइल (Brahmos Missile) तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे
सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतानं आता सीमेवर सर्वात खतरनाक ब्रह्मोस मिसाइल (Brahmos Missile) तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. लडाख आणि अरुणचल प्रदेशात चीनच्या वाढत्या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानं आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. भारताच्या या निर्णयानं चीनला देखील चांगलीच मिरची झोंबल्याचं पाहायला मिळत आहे. कारण चीनचं सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समध्ये याबाबतचा उल्लेख करण्यात आला आहे. भारतानं अशापद्धतीचा निर्णय घेणं हे सीमा वाद शांतीपूर्ण मार्गानं सोडवण्याच्या उद्देशात अडचण निर्माण करणारं ठरू शकतं, असं चीननं म्हटलं आहे. तसंच भारताच्या या निर्णयामुळे चीनसोबतच्या तणावत भर टाकण्याचं काम शेजारील देशानं केल्याचंही म्हटलं आहे.
ब्रह्मोस मिसाइल तैनात केल्यानं एका बाजूला चीन अस्वस्थ झालेला दिसत असताना दुसरीकडे चीननं भारताच्या शस्त्रांना कमकुवत ठरवलं आहे. भारताची मिसाईल ही केवळ देशाचा तात्विक लाभ आहे. चीनच्या सुरक्षेला याचा अजिबात धोका नाही, असा दावा ग्लोबल टाइम्समध्ये करण्यात आला आहे. "भारताच्या अशापद्धीच्या निर्णयामुळेच दोन्ही देशातील वाद सातत्यानं वाढत आहे आणि विनाकारण दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये कटुता निर्माण होत आहे", अशी ओरड चीनी सैन्याचे अधिकारी सोंग झोंगपिंग यांनी केली आहे.
चीनकडूनही आक्रमक पवित्रा
चीननंही देशाच्या शस्त्रसाठ्यातील घातक मिसाइल भारतीय सीमेजवळ तैनात केल्या आहेत. भारताच्या ब्रह्मोस मिसाइलचा कोणताच धोका चीनच्या सुरक्षेला नाही. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडे ब्रह्मोस सारख्या सुपरसोनिक क्रूझ मिसाइल पाडण्याची क्षमता आहे आणि त्यात येत्या काळात आणखी वाढ होणार आहे, असा दावा चीननं केला आहे. दोन्ही देशांमध्ये संघर्ष अटळ असल्यास युद्ध सुरू होण्याआधीच भारताच्या मिसाइल नष्ट करण्यात येतील असाही दावा चीननं केला आहे.