BLOG: देशवासी पाहताहेत बुलेट ट्रेनचे सपान, पण भारतीय रेल्वेला आहे का वास्तवाचे भान?

By देवेश फडके | Published: June 5, 2023 11:39 AM2023-06-05T11:39:34+5:302023-06-05T11:42:13+5:30

बालासोर येथे झालेल्या भीषण अपघाताने भारतीय रेल्वेला आरसा दाखवण्याचे काम केले आहे.

india desire bullet train but is the indian railways has aware of the reality | BLOG: देशवासी पाहताहेत बुलेट ट्रेनचे सपान, पण भारतीय रेल्वेला आहे का वास्तवाचे भान?

BLOG: देशवासी पाहताहेत बुलेट ट्रेनचे सपान, पण भारतीय रेल्वेला आहे का वास्तवाचे भान?

googlenewsNext

- देवेश फडके

भारतीय रेल्वे. प्रचंड व्यवस्थेचा भलामोठा डोलारा. हजारो किलोमीटरचे प्रवासी जाळे. किफायतशीर दरात, आरामदायी प्रवास आणि वेगाने इच्छित स्थळी पोहोचण्याचा विश्वासाचा मार्ग. मात्र, या विश्वासाला कोरोमंडल एक्स्प्रेसच्या अपघातामुळे तीव्र तडे जातात, तेव्हा अनेक प्रश्न आवासून समोर उभे राहतात. एकीकडे आपला भारत देश बुलेट ट्रेनची स्वप्न पाहत असताना, दुसरीकडे ओडिशाच्या बालासोर येथे झालेल्या भीषण अपघाताने भारतीय रेल्वेला आरसा दाखवण्याचे काम केले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

भारतीय रेल्वेला अपघात काही नवीन नाहीत. रेल्वेच्या अपघातापाई आजपर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. १९८१ मध्ये झालेला बिहार रेल्वे अपघात, १९९५ मध्ये झालेला फिरोजाबाद रेल्वे अपघात, १९९९ मध्ये झालेला गैसल रेल्वे अपघात, खन्ना रेल्वे अपघात, २००२ मध्ये झालेला हावडा-नवी दिल्ली राजधानीचा अपघात, २००५ मध्ये झालेला वलिंगोडा रेल्वे अपघात, २०१६ मध्ये झालेला इंदूर पाटणा अपघात २०२० मध्ये झालेला ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसचा अपघात हे आतापर्यंत सर्वांत भीषण अपघात मानले जात होते. मात्र, बालासोर अपघात हा सर्वांचा कळस मानावा लागेल. ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहानगा बाजार रेल्वेस्थानकाजवळ तीन ट्रेनचा अपघात झाला. लूप लाइनवर लोहखनिजाने भरलेली मालगाडी उभी होती. या मालगाडीला शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस येऊन धडकली. त्यावेळी या एक्स्प्रेसचा वेग ताशी १२८ किमी होता. ही धडक एवढी जोरात झाली की, कोरोमंडल एक्स्प्रेसचे काही डबे केवळ रुळावरून घसरले नाही, तर विरद्ध दिशेला असलेल्या रुळांवर जाऊन पडले. त्याचवेळी विरुद्ध दिशेने बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेस ताशी ११६ किमी वेगाने येत होती. ती कोरोमंडल एक्स्प्रेसच्या रुळांवरून घसरलेल्या डब्यांवर धडकली. असा हा तीन ट्रेनचा विचित्र अपघात बालासोर येथे झाला. अनेक प्रकारचे अपघात आजपर्यंत रेल्वेने पाहिले आहेत. परंतु, अशा प्रकारचा रेल्वे अपघात झाला नाही, असे अनेकांचे मत आहे.  या अपघाताने भारतीय रेल्वेच्या उणिवा पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आल्या आहेत. तिहेरी रेल्वे अपघातात चालकाची चूक किंवा यंत्रणा अपयशी ठरली नाही. हा अपघात फक्त एकाच रेल्वेचा झाला असता, तर ‘कवच’ यंत्रणा कुचकामी ठरली असती. रेल्वे वेगात असल्याने प्रतिक्रिया वेळ खूपच कमी होता, त्याला अपयश म्हणणे योग्य होणार नाही. बहनगा बाजार रेल्वेस्थानकावर ‘लूप लाइन’वर लोहखनिजाने भरलेल्या मालगाड्या होत्या. दोन्ही मुख्य मार्गांवर सिग्नल हिरवा होता. म्हणजेच, चालक निर्धारित वेगमर्यादेने गाडी चालवू शकत होता. कोरोमंडल एक्स्प्रेस १२८ किमी प्रतितास आणि दुसरी पॅसेंजर १२६ किमी प्रतितास वेगाने जात होती. या मार्गावरील निर्धारित कमाल मर्यादा १३० किमी प्रतितास असल्याने निर्धारित वेगाचे उल्लंघन चालकाकडून झालेले नाही, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

बुलेट ट्रेनची स्वप्न अवश्य पाहावीत, परंतु...

मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर बुलेट ट्रेन प्रत्यक्षात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहे. बुलेट ट्रेन सुरू करणे किंवा ती होणे हे भारतासाठी महत्त्वाचे आहे. जगभरात अनेक देश आहेत, ज्या देशांमध्ये बुलेट ट्रेनची सेवा सुरू आहे. ती केवळ सुरू नाही, तर त्याचे परिचालन उत्तमरित्या सुरू असलेले दिसते. दिवसेंदिवस बुलेट ट्रेनचा वेग नवनवे विक्रम साकारताना दिसत आहे. या देशाच्या पंक्तीत भारताला बसायचे असेल, तर बुलेट ट्रेन सुरू होणे आवश्यक आहे. मात्र, केवळ बुलेट ट्रेन सुरू करून भागणार नाही. त्यासाठी तशी यंत्रणा राबवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मुंबई-अहमदाबाद रेल्वे मार्गावर हरप्रकारच्या रेल्वेसेवा सुरू असल्याचे पाहायला मिळते. मग, तेजस असो, शताब्दी असो, दुरंतो असो, डबलडेकर असो वा एक्सप्रेस, सुपरफास्ट ट्रेन असो, यात आतापर्यंत सर्वांत वेगवान ही वंदे भारत एक्स्प्रेस आहे. मात्र, वंदे भारतला रुळावर आलेले प्राणी, जनावरे धडकल्याच्या घटना घडल्याचे पाहायला मिळते. या आणि अशा अनेक कारणांमुळे १८० किमी प्रतितास वेगाची क्षमता असलेली वंदे भारत ट्रेन पूर्ण वेगक्षमतेने चालवू शकत नाही. तर अगदी २०० किमी प्रतितास किंवा त्यापेक्षाही जलद सेवा होणारी बुलेट ट्रेन प्रत्यक्ष अपेक्षित वेगाने जाऊ शकेल का, हाही एक प्रश्न आहे. त्यासाठी वेगळा मार्ग बांधला जात असला तरीसुद्घा माणसे, विविध प्राणी, जनावरे रूळांवर येणे थांबवणे आवश्यक आहे. त्यासाठी रुळांशेजारी संरक्षक यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. सिग्नल यंत्रणा अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. एखादा तांत्रिक बिघाड झालाच तर तत्काळ केले जाणारे उपायांचा बॅकअप प्लान तयार असणे गरजेचे आहे. एकूणच उच्च स्तरावरील सुरक्षेसह संपूर्ण अद्ययावत यंत्रणा सुसज्ज होत नाही, तोपर्यंत बुलेट ट्रेनचे स्वप्न अपेक्षित प्रमाणात साकारले जाणार नाही, हेही तितकेच खरे आहे. बुलेट ट्रेनपेक्षा रेल्वेच्या पायाभूत सुविधा, सज्जता आणि सुरक्षितता यांवर भर असावा, असे मत अनेकदा मांडले गेले आहे.

एवढा मोठा डोलारा हाकायचा तर आहे पण...

भारतीय रेल्वे केवळ मेल, एक्स्प्रेस, मालगाड्या यांचेच परिचालन करत नाही. तर, मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई या मुख्य शहरांमध्ये लोकल सेवाही चालवते. याशिवाय काही अन्य मार्गांवरही लोकल, मेमू, डेमू अशा सेवा भारतीय रेल्वेकडून चालवल्या जातात. मुंबईसारख्या ठिकाणी AC लोकल सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. आताच्या घडीला या एसी लोकल सेवा अत्यल्प प्रमाणात चालवल्या जात असल्या तरी भविष्यात मात्र मुंबईतील लोकलसेवा पूर्णपणे वातानुकुलित करण्याचा मानस रेल्वेचा आहे. हे कागदावर म्हणणे अतिशय सोपे आहे. पण, ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवणे तितकेच कठीण आहे. केवळ तिकिटाचे दर हा मुद्दा नाही, तर अनेक तांत्रिक मुद्देही लक्षात घेणे आवश्यक आहेत. आता अगदी थोड्या सेवा असल्या तरी वारंवार वातानुकुलित यंत्रणा बंद पडणे, स्वयंचलित दरवाजे बिघडणे अशा एक ना अनेक तांत्रिक बिघाड वारंवार होताना दिसत आहे. याशिवाय, एसी लोकल संचरना ही साधारण लोकलप्रमाणे नाही. त्यामुळे स्थानकांतून सुटल्यापासून वेग घेणे, स्थानकांत थांबणे या बाबतीत एसी लोकल खूपच धीम्या पडतात. याचा परिणाम पाठीमागून येणाऱ्या लोकल ट्रेनवर होतो. परिणामी केवळ रेल्वेचे नाही, तर चाकरमान्यांचेही वेळापत्रक कोलमडते. एसी लोकल कधीही वेळेत नसतात, अशी ओरड सातत्याने ऐकायला मिळते. हजारो प्रवासी त्याचा दररोज अनुभवही घेत असतात. साध्या अन् छोट्या चुका टाळून एसी लोकल प्रणाली, यंत्रणा निर्दोष, सुटसुटीत तसेच साधारण लोकलप्रमाणे आटोपशीर करण्यावर रेल्वेने भर द्यायला हवा, तरच सर्व एसी लोकलची संकल्पना प्रत्यक्षात उतरू शकेल.  

भारतीय रेल्वे कात टाकतेय...

गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय रेल्वेचा विचार केल्यास देशातील रेल्वेसेवा कात टाकतेय, हेही मान्य करावे लागेल. स्थानकांना दिला जाणारा नवा मुलामा, त्यातून रेल्वेचे उत्पन्न वाढण्यासाठी केले जाणारे प्रयत्न, अत्याधुनिक रेल्वे कोच, रेल्वे कोचमधील आधुनिक, आरामदायी आणि आनंददायी प्रवासासाठी केले जात असलेले बदल, नवीन रेल्वेमार्ग बांधणे, उपलब्ध रेल्वे मार्गांची डागडुजी, सिग्नल यंत्रणा सुधारणे, रेल्वेसेवा अधिक गतिमान करण्यासाठी ठिकठिकाणी बदल करणे, रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण करणे, रेल्वेसेवा वाढवण्यावर भर देणे, सर्वच रेल्वेसेवा एलएचबी तंत्रज्ञानावर आधारित करणे असे एक ना अनेक प्रकारचे बदल होताना दिसत आहे. एवढेच नव्हे तर प्रवाशांच्या सोयीसाठी स्टेशनवर अनेक प्रकारच्या सुविधा सुरू करणे, यावरही भारतीय रेल्वेकडून भर दिला जात आहे. वंदे भारत हे देशाच्या रेल्वेसाठी एक अत्यंत आशादायी पाऊल म्हणावे लागेल. इतर विकसित देशांमध्ये असलेली रेल्वेसेवा पाहताना आपल्या भारतात अशा प्रकारची रेल्वे नाही, अशी अनेकांच्या मनात खंत निर्माण होत असेल. मात्र, त्याला उत्तर किंवा एक आशेचा किरण निर्माण करण्याचे काम वंदे भारत ट्रेनने केल्याचे दिसत आहे. केवळ वंदे भारत नाही, तर त्यासोबत हमसफरपासून ते अंत्योदयपर्यंत अनेक रेल्वेसेवा या सर्व प्रकारच्या प्रवाशांना डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेल्या पाहायला मिळतात. वास्तविक पाहायला गेले तर भारतीय रेल्वे बुलेट ट्रेनची तहान वंदे भारतवर भागवताना दिसत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

सुविधा, सुलभता प्रवाशांना हवी आहेच, पण सुरक्षिततेचे काय?

वंदे भारतची पुढची आवृत्ती म्हणून वंदे मेट्रो, वंदे भारत लोकल अशा अनेकविध योजना रेल्वेच्या यादीत समाविष्ट आहेत. प्रवाशांना सुविधा, सुलभता आणि सहजतेचा अनुभव देण्यासाठी भारतीय रेल्वेचा भर आहे. मात्र, सुरक्षिततेचे काय, असा प्रश्न बालासोर येथे झालेल्या अपघातामुळे पुन्हा समोर येतो. रेल्वेच्या पायाभूत सुविधा सुधारताना सुरक्षिततेचा भारतीय रेल्वेने गांभीर्याने विचार करणे ही काळाची गरज आहे. या अपघातामुळे आणखी एक प्रश्न उपस्थित होतो, तो तो LHB कोचच्या विश्वासार्हतेचा. नजीकच्या भविष्यात भारतीय रेल्वेत प्रत्येक ट्रेन/रेक/रेल्वेसेवा LHB तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या डब्यांची पाहायला मिळणार आहे. यासाठी रेल्वेने खूप आधीपासून प्रयत्न सुरू केले असून, ते आता अंतिम टप्प्यात आहेत. LHB कोच हे गतिमानतेसह सुरक्षित मानले जातात. एलएचबी कोचची अनेक वैशिष्ट्ये सांगितली जातात. जुन्या ICF डब्यांच्या तुलनेत उच्च वेग, आरामदायीपणा, सुविधा यांमध्ये हे डबे अनेकपटीने पुढे आहेत. एलएचबी कोच हे प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहेत. अँटी-टेलिस्कोपिक कपलर, प्रगत क्रॅश-योग्य यंत्रणा आणि आग-प्रतिरोधक सामग्री यांमुळे हे डबे अपघातांच्या बाबतीत अधिक सुरक्षित मानले जातात. मात्र, बालासोर येथे झालेल्या अपघातात सापडलेल्या दोन्ही ट्रेन या LHB डब्यांच्या होत्या. LHB डबे सुरक्षिततेसाठी विश्वासार्ह मानले गेले असले तरी अशा प्रकारच्या अपघातांमध्ये या डब्यांची झालेला अवस्था चिंताजनक म्हणायला हवी. ट्रेनचा स्पीड आणि अन्य परिस्थितींमुळे या अपघाताची भीषणता वाढली असली तरी LHB कोचची सुरक्षिततेबाबतची हमी पुन्हा एकदा भारतीय रेल्वेला तपासून पाहावी लागणार आहे, हेही तितकेच खरे आहे. 

भारतीय रेल्वेला कसे मिळणार सुरक्षिततेचे ‘कवच’

भारतीय रेल्वेने ‘कवच’ नामक प्रणाली विकसित केली आहे. ‘कवच’ म्हणजे काय? धावत्या रेल्वे गाड्यांची सुरक्षा वाढविण्यासाठी भारतीय रेल्वेने ‘कवच’ नावाची स्वतःची स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली विकसित केली आहे. कवच हे तीन भारतीय व्हेंडर्सच्या सहकार्याने रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशनने (आरएसडीओ) स्वदेशी पद्धतीने विकसित केले आहे. ही यंत्रणा लोको पायलटला धोक्याच्या क्षणी आणि अतिवेगात सिग्नल जंप करण्यापासून दूर ठेवण्यासोबतच दाट धुक्यासारख्या प्रतिकूल हवामानातही ट्रेन सुरळीत धावण्यास मदत करते. कवच एकूणच ट्रेनची सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवते. लोको पायलट ब्रेक लावू न शकल्यास ऑटोमॅटिक ब्रेकद्वारे ट्रेनचा वेग नियंत्रित होतो. ही यंत्रणा ट्रेनच्या गतीवर, हालचालीवर सतत लक्ष ठेवते आणि त्याचे सिग्नल पाठवत राहते. कोणतीही दुर्घटना घडल्यास जवळपासच्या ट्रेनवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘एसओएस’चे फीचर थेट लोको ते लोको संवादाद्वारे टक्कर टाळणे. लेव्हल-क्रॉसिंग गेट्सवर आपोआप शिट्टी वाजणे. दक्षिण मध्य रेल्वेच्या लिंगमपल्ली-विकराबाद-वाडी आणि विकाराबाद-बिदर सेक्शनवर २५० किलोमीटर अंतरावर चाचण्या झाल्या. नवी दिल्ली-हावडा आणि नवी दिल्ली-मुंबई विभागांवर मार्च २०२४ पर्यंत कार्यान्वित करण्याचे लक्ष्य आहे. मात्र, ही प्रणाली संपूर्ण देशभर शक्य तितक्या लवकर कशी कार्यान्वित करता येईल, यावर भारतीय रेल्वेला भर देण्याची आवश्यकता आहे. 

शेवटी, प्रत्येकाला आपला माणूस प्रिय असतो, तो कुशल-मंगल असावा, अशी अपेक्षा असते. प्रवासाला निघालेला व्यक्ती धडधाकडपणे इप्सितस्थळी पोहोचावा, अशा सदिच्छा दिल्या जातात. भारतीय रेल्वेने या अपघातातून धडा घेणे आणि त्यातून असे भीषण अपघात रोखण्यासाठी अत्यावश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. अपघात झाल्यापासून कमीत कमी वेळात जवळच्या दोन्ही बाजूच्या स्थानकांना सूचना जाणे, त्या स्थानकांवरील अधिकाऱ्यांनी तातडीने त्यावर अ‍ॅक्शन घेणे, रेल्वेतील मोटरमन, गार्ड यांना सूचना, माहिती मिळणे, सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला, तर तो अलर्ट तातडीने संबंधित यंत्रणांना अत्यंत कमी कालावधीत जाणे, अशा अनेक प्रकारच्या उपाययोजना भारतीय रेल्वेने करणे आवश्यक आहे.  रेल्वेची ही भारताची शान आहे आणि ती तशीच राहण्यासाठी सर्वांनी सामायिक प्रयत्न करायला हवेत. आपला प्रवास सुखाचा होवो…!!!

 

Web Title: india desire bullet train but is the indian railways has aware of the reality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.