अरे वा मस्तच! चीनवरील अवलंबित्व होणार कमी; भारतात सापडला मौल्यवान खनिज साठा
By देवेश फडके | Published: January 11, 2021 03:07 PM2021-01-11T15:07:05+5:302021-01-11T15:09:46+5:30
लिथियमसाठी भारताला कोणत्या ना कोणत्या देशांवर अवलंबून राहावे लागत आहे. आता मात्र कर्नाटकातील एका जिल्ह्यात लिथियमचा मोठा साठा सापडला आहे.
बेंगळुरू : इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बॅटरीच्या वापरासाठी लागणाऱ्या लिथियमसाठी भारताला कोणत्या ना कोणत्या देशांवर अवलंबून राहावे लागत आहे. आता मात्र भारताचे बाहेरील देशांवरील अवलंबित्व कमी होणार आहे. कारण कर्नाटकातील एका जिल्ह्यात लिथियमचा मोठा साठा सापडला आहे.
लिथियमसाठी भारत चीनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून होता. चीनवरील अवलंबित्व कमी करण्याचा भारताकडून कसोशिने प्रयत्न सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून भारताने अर्जेंटिनासोबत अलीकडेच एक करार केला आहे. भारतात हळूहळू इलेट्रॉनिक वाहनांचा वापर वाढवण्यावर भर दिला जात असून, कर्नाटकात सापडलेल्या लिथियमच्या साठ्यामुळे मोठी मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या एका वृत्तानुसार, बेंगळुरूपासून सुमारे १०० कि.मी. अंतरावर मंड्या जिल्ह्यात लिथियमचे साठे सापडले आहेत. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार हे साठे १६ हजार टन असण्याची शक्यता आहे. भारतात सापडलेला हा साठा कमी असला, तरी काही प्रमाणात दिलासादायक असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, जागतिक पातळीवरील देशांचा आढावा घेतल्यास चिलीमध्ये सर्वाधिक ८६ लाख टन, ऑस्ट्रेलियामध्ये २८ लाख टन, अर्जेंटिनामध्ये १७ लाख टन, पोर्तुगालमध्ये ६० हजार टन लिथियमचे साठे आहेत. त्या तुलनेने भारतात सापडलेला साठा खूपच कमी आहे.
भारत आणि लिथियमची गरज
लिथियम हा एक रासायनिक पदार्थ असून, हलक्या धातुंच्या श्रेणीत येतो. याला चाकू किंवा टोकदार वस्तूने सहजपणे कापले जाऊ शकते. याचा वापर करून तयार करण्यात आलेल्या बॅटरीज हलक्या आणि रिचार्ज करण्यासाठी सोपी असते. म्हणूनच लिथियमचा वापर रिचार्जेबल बॅटरीमध्ये केला जातो. या क्षेत्रात चीनचा दबदबा असून, तो मोडून काढण्यासाठी भारताने अर्जेंटिनासोबत लिथियम पुरवठ्याबाबत करार केला आहे. भारत आपली लिथियमची गरज पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आयात करतो. गेल्या वर्षी भारताने १.२ अब्ज डॉलर किमतीचे लिथियम आयात केले होते. अर्जेंटिनासह चिली आणि बोलिविया या देशांशीही लिथियम पुरवठ्याबाबत भारत लवकरच करार करण्याचा विचार करत आहे.