"शीख फुटीरतावाद्यांवरील हल्ल्यामागे अमित शाहांचा हात"; कॅनडाच्या आरोपांना भारताचे सडेतोड उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 05:19 PM2024-11-02T17:19:52+5:302024-11-02T17:20:28+5:30
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत कॅनडाच्या आरोपांवर भारताने कारवाई केली आहे.
India VS Canada : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केलेल्या बेछूट आरोपांमुळे भारतकॅनडावर प्रचंड नाराज आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल कॅनडाच्या संसदीय समितीमध्ये केलेल्या वक्तव्यावर भारताने प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने कॅनडाच्या उच्चायुक्तालयाच्या प्रतिनिधींना बोलावून आणि अशी विधाने निराधार असल्याचे सांगत ताशेरे ओढले आहेत. शुक्रवारी, कॅनडाच्या उच्चायुक्तालयाच्या प्रतिनिधीला बोलावण्यात आले आणि आरोपांचा विरोध करत अधिकाऱ्याला एक पत्र देण्यात आले. या प्रकरणावर सरकारने प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या वर्षी झालेल्या खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडाचे संबंध ताणले गेले आहेत. या प्रकरणात गेल्या काही महिन्यांपासून कॅनडाने कोणत्याही पुराव्याशिवाय भारतावर अनेक मूर्खपणाचे आरोप केले आहेत. त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत कॅनडाच्या आरोपांवर भारताने कारवाई केली आहे. भारतीय परराष्ट्र विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत घेत याबाबत खुलासा केला. आम्ही काल कॅनडाच्या उच्चायुक्तालयाच्या प्रतिनिधीला बोलावले. उपमंत्री डेव्हिड मॉरिसन यांनी भारताच्या केंद्रीय गृहमंत्र्यांबाबत समितीसमोर केलेल्या बेताल आणि निराधार संदर्भांना भारत सरकार तीव्र विरोध करते, असे सादर केलेल्या नोट्समध्ये म्हटले आहे.
जस्टिन ट्रूडो यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अलीकडेच वॉशिंग्टन पोस्टला भारताविरुद्ध गुप्तचर आणि संवेदनशील माहिती लीक केल्याची कबुली दिली होती. मात्र दुसरीकडे, खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येच्या तपासात भारत सरकारचे एजंट आणि कॅनडातील हिंसक कृत्ये यांच्यातील संबंध उघड झाल्याचा कॅनडाच्या पोलिसांनी जाहीरपणे आरोप केला होता.
उप परराष्ट्र मंत्री डेव्हिड मॉरिसन यांनी मंगळवारी संसदीय पॅनेलमध्ये कॅनडामधील शीख फुटीरतावाद्यांवर हल्ला करण्याच्या कटामागे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारचा एक उच्चपदस्थ अधिकारी होता, असं म्हटलं. त्यानंतर भारताची बदनामी करणे आणि इतर देशांवर प्रभाव टाकणे या हेतूने या आरोपांचा उद्देश असल्याचे सांगत सरकारने हे आरोप फेटाळले आहेत.
दरम्यान, रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कॅनडाच्या भूमीवर शीख फुटीरतावाद्यांना लक्ष्य करण्याच्या कटामागे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असल्याचा आरोप कॅनडाने केला होता. कॅनडाचे उप परराष्ट्र मंत्री डेव्हिड मॉरिसन यांनी संसदीय पॅनेलला सांगितले की या कटामागे अमित शाह होते.