सीरियातील ७७ भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 22:35 IST2024-12-13T22:35:02+5:302024-12-13T22:35:29+5:30

बंडखोरांनी राजधानी दमास्कससह अनेक प्रमुख शहरांवर कब्जा केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. 

india evacuates all nationals following syrian government collapse | सीरियातील ७७ भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

सीरियातील ७७ भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

सीरियातील अंतर्गत युद्धात बंडखोर गटाची सरशी झाल्याने राष्ट्राध्यक्ष बशर अल असद हे देश सोडून पळून गेले आहेत. यानंतर बंडखोरांनी सीरियाची राजधानी दमास्कससह सीरियावर ताबा मिळवला आहे. अशा परिस्थितीत भारताने सीरियामधून आपल्या सर्व नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. बंडखोरांनी राजधानी दमास्कससह अनेक प्रमुख शहरांवर कब्जा केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. 

यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी माहिती दिली. यावेळी, सीरियामध्ये असलेल्या ज्या भारतीय नागरिकांना भारतात परतायचे होते. अशा नागरिकांना आम्ही सुरक्षितपणे बाहेर काढले आहे,  आतापर्यंत ७७ भारतीयांना सीरियातून बाहेर काढण्यात आले आहे, असे रणधीर जयस्वाल यांनी सांगितले.

भारतीय दूतावासाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सीरियाच्या सीमेवर पोहोचवले, त्यानंतर लेबनॉनमधील भारतीय मिशनने त्यांचे स्वागत केले आणि त्यांना इमिग्रेशनमध्ये मदत केली, असे रणधीर जयस्वाल म्हणाले. तसेच, आम्ही लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली आणि त्यांना भारतात परत पाठवण्याची सर्व व्यवस्थाही केली. बहुतांश नागरिक भारतात परतले आहेत, तर बाकीचे आज ना उद्या पोहोचतील, असे रणधीर जयस्वाल यांनी सांगितले.

सीरियाच्या तीर्थयात्रेला गेलेले ४४ यात्रेकरू गुरुवारी बेरूतहून निघाले आहेत. ते आता परिसरातील इतर धार्मिक स्थळांच्या भेटीवर आहे. दमास्कसमधील भारतीय दूतावास अजूनही सक्रिय असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असेही रणधीर जयस्वाल म्हणाले. दरम्यान, सीरियातील सध्याची परिस्थिती पाहता भारताने शांतता आणि सर्वसमावेशक राजनीतीचे आवाहन केले आहे.

याचबरोबर, आम्ही सीरियातील घडामोडींवर सतत लक्ष ठेवून आहोत. आम्ही सर्व पक्षांना सीरियाची एकता, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता राखण्यासाठी काम करण्याचे आवाहन करतो, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच, भारताने सीरियातील सर्व वर्गांच्या आकांक्षांचा आदर करून शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक सीरियाच्या नेतृत्वाखालील राजकीय प्रक्रियेच्या गरजेवर भर दिला आहे.
 

Web Title: india evacuates all nationals following syrian government collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.