Corona Vaccine: भारताकडून 338 कोटींच्या लसींची निर्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 06:28 AM2021-02-13T06:28:43+5:302021-02-13T06:29:08+5:30
केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल; देशात पुरेसा साठा उपलब्ध
नवी दिल्ली : भारताने ८ फेब्रुवारीपर्यंत ३३८ कोटी रुपयांच्या कोरोना लसींची विविध देशांना निर्यात केली आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली.
यासंदर्भातील पुरवणी प्रश्नांवर गोयल म्हणाले की, निर्यात केलेल्या कोरोना लसींमध्ये मित्र देशांना मदतस्वरूपात दिलेल्या लसींचाही समावेश आहे. देशात कोरोना लसींचा पुरेसा साठा ठेवून मगच बाकीच्या लसींची जानेवारीपासून निर्यात करण्यात येत आहे. अॅस्ट्राझेनेका, ऑक्सफर्डने विकसित केलेल्या व पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेल्या कोविशिल्ड लसीचे ६२.७ लाख डोस भारताने विविध देशांत निर्यात केले. त्यांची किंमत १२५.४ कोटी रुपये आहे. पीयूष गोयल यांनी सांगितले की, भारतातून कोरोना लसीच्या १.०५ कोटी डोसची काही देशांना व्यावसायिक तत्त्वावर निर्यात करण्यात आली. त्या लसींची किंमत २१३.३२ कोटी रुपये आहे.
केंद्र लस उत्पादकांच्या सातत्याने संपर्कात
देशातील कोरोना लसीकरण मोहिमेत कोविशिल्ड व कोवॅक्सिन लसीचा वापर करण्यात येत आहे. कोरोना लसींच्या उत्पादनासाठी सीरम इन्स्टिट्यूट व भारत बायोटेक या कंपन्यांना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.
कोरोना लसींचा पुरेसा साठा उपलब्ध असावा यासाठी केंद्र सरकार लस उत्पादकांशी सातत्याने संपर्कात असते, असे केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.