कोरोनाच्या नव्या स्ट्रेननं टेन्शन वाढवलं; मोदी सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय
By कुणाल गवाणकर | Published: December 30, 2020 11:09 AM2020-12-30T11:09:23+5:302020-12-30T11:31:18+5:30
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळून आल्यानं मोदी सरकारचा सावध पवित्रा
नवी दिल्ली: ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनहून येणाऱ्या आणि ब्रिटनला जाणाऱ्या विमान वाहतुकीवरील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यामुळे ब्रिटन आणि भारत यांच्यातील हवाई वाहतूक बंदी ७ जानेवारीपर्यंत कायम असेल. याआधी सरकारनं ३१ डिसेंबरपर्यंत हवाई वाहतूक रोखण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता ही बंदी वाढवण्यात आली आहे.
A decision has been taken to extend the temporary suspension of flights to & from the United Kingdom till 7 January 2021: Union Civil Aviation Minister Hardeep Singh Puri pic.twitter.com/LgjsSSLxFM
— ANI (@ANI) December 30, 2020
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा आणि आधीच्या तुलनेत अधिक धोकादायक स्ट्रेन आढळून आल्यानं केंद्र सरकारनं २१ डिसेंबरला महत्त्वाचा निर्णय घेतला. ब्रिटनहून भारताकडे येणारी हवाई वाहतूक रोखण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी २२ डिसेंबरला रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी सुरू झाली. हा निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत लागू होता. मात्र नव्या स्ट्रेनचा धोका कायम असल्यानं या बंदीची मर्यादा वाढवण्यात आली आहे. आता ७ जानेवारीपर्यंत भारत आणि ब्रिटनमधील हवाई वाहतूक बंद असेल.
ब्रिटनमध्ये आढळून आलेला कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आता भारतात हातपाय परत असल्याचं दिसू लागलं आहे. ब्रिटनहून आलेल्या २० प्रवाशांमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. याआधी काल दिवसभरात देशाच्या विविध भागांमध्ये ६ जणांना नव्या स्ट्रेनची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळे आरोग्य विभागाची धाकधूक वाढली आहे. त्यातच ब्रिटनहून आलेल्या अनेक प्रवाशांशी संपर्क होत असल्यानं चिंतेत भर पडली आहे.
नव्या स्ट्रेनमुळे संसर्गाची तीव्रता ७० टक्क्यांनी वाढली
ब्रिटनमध्ये आढळलेला नवीन स्ट्रेन पूर्वीच्या रूपांपेक्षा जास्त संसर्गजन्य असल्याची माहिती वैज्ञानिकांनी दिली. याचा अर्थ असा आहे की नवीन विषाणू पूर्वीच्या विषाणूपेक्षा त्वरीत संसर्ग पसरवतो. लोकांना दिले जात असलेली कोरोनाची लस नवीन स्ट्रेनविरूद्ध लढण्यातदेखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल आणि शरीरावर प्रभावी ठरेल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रसार झाल्यामुळे ब्रिटन सरकारने नाताळच्या खरेदीसाठी तसंच सण साजरा करण्यावर अनेक निर्बंध घातले आहेत.