अमेरिका आणि चीनशी योग्य ताळमेळ साधण्याचे भारतासमोर आव्हान : विजय गोखले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 14:05 IST2020-03-04T14:00:25+5:302020-03-04T14:05:45+5:30
चीनबाबत आपला अभ्यासच कमी असल्याने आपले काही अंदाज चुकत गेले. संकटाला तोंड देण्याच्या चीनच्या क्षमतेला कमी लेखून चालणार नाही.

अमेरिका आणि चीनशी योग्य ताळमेळ साधण्याचे भारतासमोर आव्हान : विजय गोखले
पुणे :अमेरिकेने स्वत:नेच निर्माण केलेल्या जागतिक व्यवस्थेला धक्के देण्यास सुरूवात केली आहे. ब्रेक्झिटमुळे युरोपियन महासंघाला मोठा फटका बसला आहे. रशियाला नव्या रशियाच्या निर्मितीसाठी भक्कम, शाश्वत आर्थिक पाया साधता आलेला नाही. जपानच्या हातून संधी निघून गेली आहे. चीनचा उदय होत असताना जगाच्या क्षितीजावर अमेरिकेशिवाय कोणीही नाही. हीच भारतासाठी योग्य संधी आहे. सध्याची महासत्ता अमेरिका आणि उगवती महासत्ता चीन या दोघांशीही योग्य ताळमेळ साधण्याचे आव्हान आपल्यापुढे आहे,असे मत माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी मंगळवारी व्यक्त केले.
’सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज’ (सीएएसएस) आणि ’महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’ (एमईएस) यांच्या वतीने '२१ व्या शतकातील भारत - चीन संबंध: आव्हाने आणि संधी’ या परिसंवादात ते बोलत होते.याप्रसंगी एमईएसचे अध्यक्ष व कॅसचे संचालक एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), कॅसचे अध्यक्ष मेजर जनरल शिशिर महाजन, माजी राजनैतिक अधिकारी एम. के. मंगलमूर्ती आदी या वेळी उपस्थित होते.
गोखले म्हणाले, चीनचा विकासाचा दर हा जगात सर्वाधिक आहे. आपल्या विकासाचा दर वाढला तरी आपण पुढच्या दोन दशकांमध्येही चीनची बरोबरी करणे शक्य होणार नाही. चीनचा विकासदर कदाचित कमी होऊ शकेल. काही आर्थिक संकटे येऊ शकतील. सध्याच्या कोरोनाचाही चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. मात्र, संकटाला तोंड देण्याच्या चीनच्या क्षमतेला कमी लेखून चालणार नाही. चीनच्या नेतृत्वाने आता फक्त विकासावर भर देण्याऐवजी राहणीमानाचा दर्जा सुधारण्यावर भर दिला आहे. पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, विज्ञान, संशोधन याला ते अधिक महत्त्व देत आहेत. शिक्षणावर भर देऊन तांत्रिक बाबतीत युरोपीय देशांनी घेतलेली आघाडी चीनने मोडून काढण्याचा चंग बांधला आहे. पूर्वीच्या ‘कॉपी कॅट मॉडेल’ या ओळखीतून बाहेर पडत चीन आता नव्या तंत्रज्ञानाच्या निर्मितीत आघाडी घेत आहे, असे निरीक्षणही गोखले यांनी नोंदवले.
आपण कच्चा माल, इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअरसाठी चीनवर अवलंबून आहोत. त्यामुळे आपण चीनला थेट आव्हान देऊ शकणार नाही. मात्र अमेरिका-चीनमधील व्यापारयुद्ध आणि करोना व्हायरस यामुळे भारताला मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध झाली आहे. इतरही देश त्यासाठी सज्ज आहेत. त्यांचे धोरण तुलनेने अधिक खुले आहे. त्यामुळे ही संधी साधायची असेल तर भारताला आपल्या धोरणांमध्ये व्यापक बदल करावे लागतील,
चीनबाबत आपला अभ्यासच कमी असल्याने आपले काही अंदाज चुकत गेले. आजही आपल्याकडे चीनविषयीच्या अभ्यासासाठी शिष्यवृत्त्या नाहीत. त्यामुळे आपल्याकडे चीनविषयीच्या ज्ञानाची प्रचंड कमतरता आहे. ही कमतरता भरून काढणे ही केवळ सरकारची नव्हे तर समाजाचीही जबाबदारी आहे. या शिष्यवृत्त्यांमध्ये चीनमध्ये काय चालले आहे, याच्या अभ्यासाबरोबरच जगभरात चीनविषयी काय सुरू आहे, याचा अभ्यास होणेही महत्त्वाचे असल्याचे गोखले यांनी सांगितले.
अन्य सत्रांमध्ये तैवान अॅल्युम्नाय असोसिएशनच्या अध्यक्षा नम्रता हसीजा, लेफ्टनंट जनरल प्रवीण बक्षी (निवृत्त), कमांडर अर्नब दास (निवृत्त), परराष्ट्र सेवेतील निवृत्त अधिकारी गौतम बंबावाले, एम. के. मंगलमूर्ती, सुधीर देवरे, प्रियांका पंडित यांनी आपली मते मांडली.