उत्तम धोरणांमुळेच भारत वेगवान अर्थव्यवस्था; अर्थमंत्र्यांचे विरोधकांना सडेतोड उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 06:29 AM2024-07-31T06:29:25+5:302024-07-31T06:30:16+5:30
सीतारामन यांनी म्हटले की, अर्थसंकल्पात केवळ दोनच राज्यांना पैसे देण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप निराधार आणि दिशाभूल करणारा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सरकारच्या उत्तम धोरणांमुळेच आज भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी केले.
वित्त वर्ष २०२४-२५ च्या अर्थसंकल्पावरील चर्चेला लोकसभेत उत्तर देताना सीतारामन बोलत होत्या. अर्थसंकल्पावर विरोधकांनी केलेल्या टीकेला त्यांनी सडेतोड उत्तरे दिली, तसेच आक्षेप खोडून काढले.
सीतारामन यांनी म्हटले की, चालू वित्त वर्षासाठी ४८.२१ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सरकारने मांडला. त्यातील तरतुदी करताना सामाजिक आणि भौगोलिक समतोल साधण्यावर भर देण्यात आला. प्रत्येक वर्ग आणि क्षेत्राकडे लक्ष देण्यात आले.
भाषणात नाव नसले म्हणजे तरतूद नाही असे नव्हे !
सीतारामन यांनी म्हटले की, अर्थसंकल्पात केवळ दोनच राज्यांना पैसे देण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप निराधार आणि दिशाभूल करणारा आहे. अर्थसंकल्पीय भाषणात एखाद्या राज्याचे नाव नसले म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की त्या राज्यासाठी काही तरतूदच करण्यात आली नाही. २००४-५ च्या अर्थसंकल्पात १७ राज्यांचे नावे नव्हती. २०१०-११ च्या अर्थसंकल्पात १९ राज्यांची नावे नव्हती. २०१४-१५ च्या अर्थसंकल्पात १० राज्यांची नावे नव्हती.
कोरोना साथीनंतरही अर्थव्यवस्था वेगाने वाढली
सीतारामन यांनी म्हटले की, सरकारने अर्थव्यवस्थेचे उत्तम व्यवस्थापन केले तसेच पायाभूत सुविधांवरील भांडवली खर्च वाढवला. त्यामुळे कोरोना साथीनंतर आपली अर्थव्यवस्था तेजीने वाढली. आज आपण जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहोत.
वित्तीय तूट ४.५ टक्क्यांवर आणणार
सीतारामन यांनी म्हटले की, आपली अर्थव्यवस्था केवळ सुस्थितीतच नाही, तर वित्तीय तूट कमी करण्याच्या मार्गावर प्रगती करीत आहे. वित्तीय तूट २०२५-२६ पर्यंत ४.५ टक्क्यांवर आणण्याचे आपले लक्ष्य आहे. चालू वित्त वर्षात ती ४.९ टक्के राहण्याचा अंदाज आहे. याचे सर्व श्रेय अर्थव्यवस्थेच्या उत्तम व्यवस्थापनास जाते. वित्त वर्ष २०२३-२४ मध्ये देशाच्या सकळ राष्ट्रीय उत्पन्नाचा वृद्धी दर ८.२ टक्के राहिला. जगातील सर्वाधिक वृद्धी दर नोंदविण्याचा किताब कायम राखण्यात यशस्वी ठरलो.
हा तर अपमान..
हलवा समारंभाबाबत त्यांनी म्हटले की, ‘अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेत हलवा समारंभ हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. त्यावर टीका करणे म्हणजे या कार्यात जुंपून घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अवमान आहे.