भारताने उडवली पाकिस्तानची दाणादाण
By admin | Published: October 23, 2016 06:13 PM2016-10-23T18:13:42+5:302016-10-23T20:22:47+5:30
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रविवारी झालेल्या अटीतटीच्या लढतीत भारताने पाकिस्तानवर 3-2 ने मात केली.
Next
>ऑनलाइन लोकमत
कुआंटन, दि. 23 -आशियाई चॅम्पियन चषक हॉकी स्पर्धेत अव्वल मानांकित भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाचा ३-२ असा फडशा पाडला. हा महामुकाबला चांगलाच रंगला.
अनेक दिवसापासून चर्चेत असलेल्या या सामन्याच्या प्रारंभी पाकिस्तान संघाच्या खेळाडूंनी जोरदार सुरूवात करत भारतीय संघावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या खेळाडूंनी आपले धैर्य आणि संयम राखत पाकच्या हॉकीपटूंना जोरदार उत्तर दिले. युवा स्ट्रायकर प्रदीप मोर याने आपल्या १३व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळतांना पहिला गोल नोंदविला. त्यामुळे सामन्याच्या ११ व्या मिनीटातच भारताला आघाडी मिळाली. त्यानंतर मात्र पाकिस्तानच्या मोहम्मद रिजवान याने ३१ व्या मिनिटाला मोहम्मद इरफान (ज्यु.) याने ३९ व्या मिनिटाला गोल करत २-१ अशी आघाडी घेत भारताच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण केले.
भारताच्या रूपिंदर पाल सिंह याने ४३ व्या मिनटाला भारताला एकमात्र पेनल्टी कार्नरच्या आधारे बरोबरी मिळवून दिली. तर रमनदीप याने तलविंदर सिंह याने दिलेल्या पासवर गोल करत ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. त्यामुळे भारताला विजय साध्य झाला. या विजयामुळे भारताचे तीन सामन्यात सात गुण झाले आहेत. भारताने आपल्या पहिल्या सामन्यात जपान संघाचा १०-२ असा पराभव केला होता. तर दूस-या सामन्यात मात्र भारतीय संघाला दक्षिण कोरिया संघाकडून १-० असा पराभव स्विकारावा लागला होता.(वृत्तसंस्था)
भारताच्या शानदार चाली, जोरदार प्रत्युत्तर-
हा सामना पहिल्या पासूनच चुरशिचा राहिला. पाकिस्तान संघाला सामन्याच्या पहिल्या मिनिटातच पहिला पेनल्टी कार्नर मिळाला. मात्र भारतीय गोलकीपर पीआर. श्रीजेश याने पाक संघाच्या चेहºयावर हसु उमलू दिले नाही. श्रीजेश याने पहिल्यांदा मोहम्मद अलीम बिलाल याने सरकावलेला चेंडू पॅडने रोकला. त्यानंतर पाकिस्तान संघाने चौथ्या मिनिटात आणखी एक शानदार फळी रचत मात्र भारतीय हॉकीपटूंनी त्यांचे हे प्रयत्नही हाणून पाडले. भारतीय हॉकीपटूंनी देखील या काळात जोरदार चाली रचल्या. मात्र भारतीय हाकीपटूंना त्यात अपयश आले. भारताकडून तलविंदर सिंह याने पहिला गोल साधून दिला. प्रदीप याने २२ व्या मिनिटाला भारतीय संघाला आघाडी मिळवून दिली. प्रदीप याने मारलेला फटका रोखण्यात पाकिस्तानी गोलकीपर इमरान बट याला पुर्णत: अपयश आले. या नंतर संकटात सापडलेल्या पाक संघाने या नंतर लागोपाठ हल्ले करण्याचे प्रयत्न केले. मात्र भारतीय हॉकीपटूंनी ते हाणून पाडले. मध्यांतरला भारतीय संघ १-० ने आघाडीवर होता. त्यानंतरच्या सत्रात पाकिस्तानने मध्यांतरानंतरच्या पहिल्याच मिनिटात गोल साधत बरोबरी साधली. मात्र त्यानंतरच्या खेळात पाक संघाला वरचढ होऊ न देता सामन्यावर नियंत्रण ठेवत विजयी गोल साधत पाकचा फडशा पाडला.