केंद्र सरकारनं जारी केली मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची पहिली झलक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 02:07 PM2017-09-15T14:07:42+5:302017-09-15T14:09:13+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी गुरुवारी ( 14 सप्टेंबर ) बहुप्रतीक्षित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन केले. 'पीआयबी इंडिया'नं बुलेट ट्रेनसंदर्भातील एक व्हिडीओ ट्विट केला आहे.
नवी दिल्ली, दि. 15 - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी गुरुवारी ( 14 सप्टेंबर ) बहुप्रतीक्षित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन केले. या बुलेट ट्रेन प्रकल्पावर 1 लाख 10 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. दरम्यान, देशातील ही पहिली बुलेट ट्रेन दिसायला कशी आहे?, तिचा मार्ग कसा असणार आहे? याबाबतची प्रचंड उत्सुकता नागरिकांमध्ये आहे.
या पार्श्वभूमीवर 'पीआयबी इंडिया'नं संदर्भातील एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये बुलेट ट्रेनचं स्वरुप, बुलेट ट्रेनचा मार्ग यासंदर्भातील माहिती आहे. दरम्यान, हा 508 किमीचा हा मार्ग 2022 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. यासाठी 700 हेक्टरहून अधिक जमीन संपादित करण्यात येणार असून, ठाणे-वाशी भागातून 7 किमी समुद्राखालून ही रेल्वे धावणार आहे. याशिवाय ही रेल्वे मुंबईतून 15 किमी भूमिगत मार्गाने जाणार आहे. हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची (एचएसआरसी) ही महत्त्वाकांक्षी योजना आहे.
How will the #BulletTrain look like? A first look... pic.twitter.com/xZVyxijWLV
— PIB India (@PIB_India) September 15, 2017
जाणून घेऊया मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची वैशिष्ट्यं
1 . बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची किंमत 1 लाख 8 हजार कोटी रुपये आहे. या बुलेट ट्रेनसाठी जपाननं 88 हजार कोटीचं कर्ज दिलं आहे. हे कर्ज 0.1% व्याज दराने मिळणार आहे. 50 वर्षात हे कर्ज फेडावे लागणार आहे.
2. या प्रकल्पांतर्गत काही ट्रेन जपानहून येणार आहेत तर काही ट्रेन्सची निर्मिती भारतातच केली जाणार आहे.
3. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे मेक इन इंडिया योजनेची ताकद वाढण्यास मदत होईल.
4. तंत्रज्ञान तसेच औद्योगिक क्षेत्राचाही यानिमित्तानं विकास होण्यास मदत होईल.
5. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे 24 हजार रोजगार निर्माण होणार असल्याचे म्हटले जाते आहे.
6. 1 लाख 8 हजार कोटीं रुपयांच्या या महत्त्वकांक्षी प्रकल्प मुंबई ते अहमदाबादचे 508 किलोमीटरचे अंतर ताशी 350 कि.मी. वेगाने पूर्ण होईल. महाराष्ट्रातील 156 कि.मी., गुजरातमधील 351 कि.मी. या टप्प्यातून ही ट्रेन धावणार आहे.
7. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रवास सुरू होणार असून ते पुढे ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिल्लीमोरा, सुरत, भरुच, बडोदा, आनंद, अहमदाबाद, साबरमती असे 12 स्टेशन असतील.
8. या प्रकल्पासाठी 700 हेक्टरहून अधिक जमीन संपादित करण्यात येणार असून, ठाणे-वाशी भागातून 7 किमी समुद्राखालून ही ट्रेन धावणार आहे. याशिवाय ही रेल्वे मुंबईतून 15 किमी भूमिगत मार्गाने जाणार आहे.
9. अहमदाबाद-मुंबई अंतर रेल्वेनं पार करण्यासाठी सध्या 7 ते 8 तास लागतात. मात्र बुलेट ट्रेनमुळे हे केवळ तीन तासांत हे अंतर पार करता येणार आहे.
10. बडोदा शहराजवळ ही रेल्वे ४५ डिग्रीचे वळण घेणार आहे.
बडोद्यात ट्रेनिंग सेंटर
बडोदा येथे ६०० कोटी रुपये खर्च करून, ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती, हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने दिली. एनएचएसआरसीचे कार्यकारी संचालक आचल खरे यांनी सांगितले की, नॅशनल अकॅडमी ऑफ इंडियन रेल्वेच्या पाच हेक्टर जमिनीवर केंद्र उभारण्यात येईल. डिसेंबर २०२० पर्यंत हे केंद्र सुरू होईल.