सावधान! देशात 4 महिन्यांनंतर एका दिवसांत कोरोनाचे 700 रुग्ण, महाराष्ट्रासह 6 राज्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 08:31 PM2023-03-16T20:31:49+5:302023-03-16T20:33:17+5:30
India Covid-19 Cases: केंद्र सरकारने दिला सावधानतेचा इशारा अन् महत्त्वाचा सल्ला
Covid Cases in India: भारतात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सुमारे चार महिन्यांनंतर, भारतात 700 हून अधिक नवीन प्रकरणे एकाच दिवसात नोंदवली गेली आहेत. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 754 नवीन रुग्ण आढळले आहेत. याची काळजी घेत केंद्र सरकारच्या आरोग्य सचिवांनी सहा राज्यांना पत्र लिहिले आहे.
पत्रात म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांत कोविडच्या प्रकरणांमध्ये घट झाली होती, परंतु गेल्या एक आठवड्यापासून प्रकरणांमध्ये अचानक वाढ होत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवर नियंत्रण ठेवण्याकडे लक्ष दिले पाहिजे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी ज्या सहा राज्यांना पत्र लिहिले आहे त्यात महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक यांचा समावेश आहे. आरोग्य सचिवांनी पत्रात म्हटले आहे की 15 मार्चपर्यंत प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. राज्य सरकारांनी चाचणी, उपचार, ट्रॅक, लसीकरण यावर भर दिला पाहिजे.
केंद्राकडून राज्यांना खबरदारी घेण्याचा सल्ला
केंद्रीय आरोग्य सचिवांनी या राज्यांचे मुख्य सचिव, प्रधान सचिव यांना पत्र लिहून आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच या प्रकरणावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कोरोना चाचणी करणे, कोरोनाच्या प्रकरणावर सतत लक्ष ठेवणे, नवीन फ्लू, विषाणू किंवा इन्फ्लूएंझा यांचे निरीक्षण करणे, जीनोमिक सिंड्रोम चाचणी करणे आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भारतात एका दिवसात कोरोनाचे 754 नवे रुग्ण
754 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर देशात कोरोना बाधितांची संख्या 4,46,92,710 झाली आहे. त्याच वेळी, सक्रिय रुग्णांची संख्या 4,623 वर पोहोचली आहे. गेल्या वर्षी 12 नोव्हेंबर रोजी देशात दररोज 734 संसर्गाची प्रकरणे समोर आली होती. कर्नाटकमध्ये संसर्गामुळे एका रुग्णाच्या मृत्यूनंतर देशातील मृतांची संख्या 5,30,790 वर पोहोचली आहे.
कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के
आकडेवारीनुसार, भारतात आतापर्यंत एकूण 4,41,57,297 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत, तर कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे. रुग्णांच्या बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.80 टक्के आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशात देशभरात लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 220.64 कोटी अँटी-कोविड-19 लसींचे डोस देण्यात आले आहेत.