India GDP: 'देशाचा GDP 7.4 टक्के दराने वाढणार, पुढच्या वर्षी हा वेग कायम राहणार'- निर्मला सीतारमण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 07:12 PM2022-08-26T19:12:55+5:302022-08-26T19:13:02+5:30
'जागतिक अर्थव्यवस्था संकटातून जात आहे, अशा परिस्थितीत सावध पाउले टाकावी लागतील.'
नवी दिल्ली: देशातील वाढती महागाई आणि जीडीपी दरावरुन विरोधत सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत असतात. पण, आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाच्या जीडीपीबाबत महत्वाची माहिती दिली. निर्मला सीतारमण म्हणाल्या की, ''या आर्थिक वर्षात देशातील GDP 7.4 टक्के दराने वाढेल आणि पुढील आर्थिक वर्ष 2024 मध्येही हा दर काम असेल.'' FE बेस्ट बँक्स अवॉर्ड्स शोमध्ये बोलताना सीतारमण यांनी ही माहिती दिली.
पुढील दोन वर्षात वेगाने वाढ होणार...
यावेळी त्या म्हणाल्या की, 'येत्या दोन आर्थिक वर्षांत भारताचा विकास दर सर्वाधिक वेग पकडेल असेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेने व्यक्त केला आहे. रिझर्व्ह बँकेनेही अशाच प्रकारचा अंदाज व्यक्त केला आहे. जागतिक अर्थव्यवस्था संकटातून जात आहे, अशा परिस्थितीत सावध पाउले टाकावी लागतील. जागतिक अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे, ज्यामुळे निर्यात क्षेत्राला अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल. पण, सरकार अशा सर्व आव्हानांचा सामना करण्यावर काम करत आहे,' अशी माहिती त्यांनी दिली.
मोफतच्या योजनांमुळे भार वाढणार
सरकारच्या मोफत योजनांवर बोलताना त्या म्हणाल्या की, 'एखाद्या मोफत योजनेची घोषणा करण्यापूर्वी सरकारने विचार करावा की, याचा इतर क्षेत्रावर परिणाम पडणार नाही. जे पक्ष निवडणुकीपूर्वी मोफत योजनांची आश्वासने देत आहेत, त्यांनी सत्तेत आल्यानंतर आपल्या बजेटवर लक्ष द्यायला हवं,' असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी आपवर लगावला.