जीडीपी ४.५ टक्क्यांनी घसरण्याची शक्यता; डून अॅण्ड ब्राडस्ट्रीटचा अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 01:54 AM2020-08-13T01:54:04+5:302020-08-13T06:52:23+5:30
डून अॅण्ड ब्राडस्ट्रीटच्या जागतिक अहवालात जगभरातील विविध देशांच्या चालू आर्थिक वर्षातील वाढीसंबंधात अंदाज वर्तविण्यात आले आहेत. त्यामध्ये भारताबाबतही वरील अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबई : कोरोनाच्या प्रकोपाने जगातील सर्वच देशांना ग्रासले असताना भारताच्या एकूण देशांतर्गत उत्पादनामध्ये (जीडीपी) चालू आर्थिक वर्षात ४.५ टक्क्यांनी घसरण होण्याची दाट शक्यता आहे. असे असले तरी पुढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था भरारी घेऊन ६.३ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवू शकते.
डून अॅण्ड ब्राडस्ट्रीटच्या जागतिक अहवालात जगभरातील विविध देशांच्या चालू आर्थिक वर्षातील वाढीसंबंधात अंदाज वर्तवण्यात आले आहेत. त्यामध्ये भारताबाबतही वरील अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या न भुतो भविष्यती लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. डून अॅण्ड ब्राडस्ट्रीटचे जागतिक मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ. अरुण सिंग यांनी सांगितले की, भारतातील आर्थिक व्यवहार तीन टप्प्यांमध्ये खुले करण्यात आले असले तरी अनेक ठिकाणी अद्यापही कंटेन्मेंट झोन असल्यामुळे तेथील लॉकडाऊन सुरूच आहे. यामुळे देशातील उत्पादक आणि पुरवठादार यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, त्याचा फटका एकूणच अर्थव्यवस्थेला बसत आहे. याबरोबरच देशातील वाढती महागाई, कमी झालेला रोजगार व वाढत असलेली बेरोजगारी यामुळे अर्थव्यवस्थेसमोर नवनवीन संकटे उभी ठाकत आहेत. या सर्व घटकांचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्था संकोचण्यामध्ये होणार असल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले.
देशातील सद्यस्थितीचा परिणाम भारतीय रिझर्व्ह बँक तसेच सरकारच्या धोरणावरही होणार असून, त्यांना आपल्या धोरणामध्ये काही बदल करणे अपरिहार्य ठरण्याची शक्यता सिंग यांनी व्यक्त केली आहे.
जगभरातील विविध देशांमध्ये कोरोनानंतर असलेल्या स्थितीबाबतही अहवालात भाष्य करण्यात आले आहे. या अहवालात भारत, चीन, जपान व सिंगापूर यापैकी एकाही आशियाई देशाचे रेटिंग बदलण्यात आलेली नाही. याचाच अर्थ आशियातील देशांवर कोरोनाचा कोणताच परिणाम झालेला दिसून येणारा नाही. आशियाई देश पुढील आर्थिक वर्षात पुन्हा विकासाच्या मार्गावर येतील, असे मत या अहवालात आहे.
जगभरातील ११ देशांच्या रेटिंगमध्ये या अहवालात वाढ करण्यात आली आहे. यामध्ये अल्बानिया, बोस्निया व हर्जेगोविना, क्रोएशिया, सायप्रस, झेक रिपब्लिक, डेन्मार्क, हंगेरी, रोमानिया, स्लोवाकिया, स्पेन आणि उरुग्वे या देशांचा समावेश आहे. या ११ ही देशांचा रेटिंगमध्ये या अहवालात वाढ करण्यात आली आहे.
आगामी वर्षाबाबत आशादायक स्थिती
चालू आर्थिक वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये घसरण होणार असली तरी आगामी वर्षात ती पुन्हा भरारी घेण्याची शक्यता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. पुढील वर्षी भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ६.३ टक्के राहण्याची शक्यता या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आली आहे.
याशिवाय जगातील अन्य प्रमुख अर्थव्यवस्थांमध्येही या आर्थिक वर्षात घसरण होण्याची शक्यता या अहवालामध्ये व्यक्त केली गेली आहे. यामध्ये अमेरिका (५.३ टक्के घसरण), जपान (५.६ टक्के घसरण) यांचा समावेश आहे. मात्र जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनला चालू आर्थिक वर्षात २ टक्के वाढीचा लाभ मिळणार असल्याचे अहवाल स्पष्ट करतो.
सन २०२१-२२ या आगामी आर्थिक वर्षात अन्य अर्थव्यवस्थांमध्येही वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामध्ये अमेरिका (२.९ टक्के वाढ), चीन (५.५ टक्के वाढ) आणि जपान (१.३ टक्के वाढ) या देशांमध्ये वरील प्रमाणे वाढ होण्याची शक्यता आहे.