लवकरच सात नवीन Bullet Trains सुरू होणार; कोणत्या शहरांमध्ये धावणार, जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 08:54 AM2020-08-01T08:54:31+5:302020-08-01T08:57:47+5:30
भारतीय रेल्वेने हाय स्पीड आणि सेमी हाय स्पीड रेल कॉरिडोरसाठी सात नवीन मार्ग निवडले आहेत.
नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचे संकट असले तरी भारतीय रेल्वेचा सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनला उशीर होणार नाही. मुंबई-अहमदाबाद मार्गावर हाय-स्पीड कॉरिडोरचे काम सुरू आहे, तेथे लवकरच बुलेट ट्रेन धावणार आहे. दरम्यान, भारतीय रेल्वे लवकरच देशवासीयांसाठी आणखी सात बुलेट ट्रेन आणण्याची शक्यता आहे. यासाठी रेल्वेने तयारी सुरू केली असून, त्यासाठी भारतीय रेल्वेने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) सोबत हातमिळवणी केली आहे. नवीन बुलेट ट्रेनसाठी एनएचएआय जमीन संपादन करेल.
याचबरोबर, भारतीय रेल्वेने हाय स्पीड आणि सेमी हाय स्पीड रेल कॉरिडोरसाठी सात नवीन मार्ग निवडले आहेत. या मार्गावर अधिक बुलेट ट्रेन लवकरच धावतील. हायस्पीड रेल्वे मार्गासह एक्सप्रेस वे किंवा हायवे विकसित करण्याचेही नियोजन केले जात आहे. अहवालानुसार, इन्फ्रा सेक्टरच्या ग्रुप बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. एनएचएआयद्वारे भूसंपादनासाठी ४ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही समिती या प्रक्रियेला पुढे घेऊन जाईल.
हाय स्पीड कॉरिडोरवर (हाय स्पीड) ट्रेन ३०० किमी प्रतितास वेगाने धावू शकतात तर सेमी हाय स्पीड कॉरिडोरवर १६० किमी प्रतितास वेगाने गाड्या धावतील. या अहवालानुसार, जे सात मार्ग निवडेले आहे. त्यामध्ये दिल्ली-नोएडा-आग्रा-लखनऊ-वाराणसी आणि दिल्ली-जयपूर-उदयपूर-अहमदाबादचा समावेश आहे. तर दुसऱ्या कॉरिडोर मार्गांमध्ये मुंबई-नाशिक-नागपूर, मुंबई-पुणे-हैदराबाद, चेन्नई-बंगळुरू-म्हैसूर यांचा समावेश आहे. तसेच, दिल्ली-चंडीगड-लुधियाना-जालंधर-अमृतसर मार्गाचाही समावेश असणार आहे.
देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे. हाय-स्पीड कॉरिडोर मुंबई-अहमदाबाद मार्गावर काम सुरू आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, कोरोना व्हायरसचे संकट असले तरीही डिसेंबर २०२३ पर्यंत हा मार्ग तयार होईल. या मार्गावर बुलेट ट्रेन ताशी ३२० किमी वेगाने धावतील. बुलेट ट्रेनमुळे अहमदाबाद ते मुंबई या प्रवासासाठी सुमारे २ तास ७ मिनिटे लागतील. प्रकल्पातील एकूण अंतर सुमारे ५०८ किमी आहे.